Jay Pawar : गेल्या काही दिवसांपासून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत असलेल्या प्रकरणावर जय पवार यांनी अखेर आपली प्राथमिक भूमिका स्पष्ट केली आहे. जय पवार यांनी आज पिंकी माळी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणावर पुढील आठवड्यात सविस्तर पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले असून, सध्या सुरू असलेल्या तपासावर भाष्य करणे टाळले आहे.
कुटुंबीयांचे सांत्वन आणि तपासाची प्रतीक्षा-
पिंकी माळी यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर जय पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला असून या कठीण प्रसंगात आपण त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. पत्रकारांनी प्रकरणाच्या तपासाबाबत विचारले असता ते म्हणाले, “सध्या या प्रकरणाचा तपास अधिकृत यंत्रणांकडून सुरू आहे. जोपर्यंत तपास यंत्रणा त्यांचा अंतिम अहवाल सादर करत नाहीत, तोपर्यंत या विषयावर कोणतेही भाष्य करणे घाईचे ठरेल. नवीन अहवालातून नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.”
रोहित पवारांच्या भूमिकेवर स्पष्टीकरण-
रोहित पवार हे त्यांच्या पद्धतीने या विषयाची माहिती घेत आहेत आणि पुरावे गोळा करत आहेत. प्रत्येक लोकप्रतिनिधीची काम करण्याची स्वतःची एक शैली असते,” असे त्यांनी यावेळी नमूद केले. तपास यंत्रणांच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पत्रकार परिषदेत करणार ‘मन की बात’-
जय पवार यांनी आगामी काळात घेणाऱ्या पत्रकार परिषदेबाबत मोठी घोषणा केली आहे. “पुढच्या आठवड्यात मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन माझे सविस्तर विचार मांडणार आहे. माझ्या मनात जे काही आहे आणि या प्रकरणाकडे मी ज्या दृष्टीने पाहतो, ते सर्व मी स्पष्टपणे सांगीन,” असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, आपल्यावर सध्या कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा इतर दबाव नसल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.










