LPG cylinder : महागाईच्या झळा सहन करणार्या सर्वसामान्यांना पुन्हा मोठा फटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत 29 रुपयांची वाढ केली आहे. ही नवीन दरवाढ मध्यरात्री 12 वाजल्यापासून लागू झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या इंधन दरांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या दरवाढीनंतर देशातील प्रमुख शहरांमधील सुधारित किंमत पुढीलप्रमाणे आहेत. मुंबईत गॅस सिलिंडरचे दर 912.50 रुपयांवरून वाढून 941.50 रुपये झाले आहेत. दिल्लीत सिलिंडरची किंमत 913 रुपयांवरून 942 रुपये झाली आहे. कोलकाता शहरात ग्राहकांना आता एका सिलिंडरसाठी 968 रुपये मोजावे लागतील. तीन महिन्यांत दुसर्यांदा एलपीजीच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. यापूर्वी 7 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे दर 60 रुपयांनी वाढवण्यात आले होते.
गेल्या तीन महिन्यांतील ही घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरातील दुसरी वाढ आहे. यापूर्वी 7 मार्च रोजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आजच्या 29 रुपयांच्या दरवाढीनंतर अवघ्या तीन महिन्यांत घरगुती एलपीजी सिलिंडर 89 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे आधीच महागलेल्या पेट्रोल-डिझेलच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या खिशावरील भार आणखी वाढणार आहे.
वाढत्या इंधन दरांबाबत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस पक्षाने एक्स वर पोस्ट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, महागाईचा चाबूक पुन्हा एकदा सर्वसामान्यांवर चालवण्यात आला असून, घरगुती गॅस सिलिंडर 29 रुपयांनी महाग करण्यात आला आहे. मोदींची रणनीती स्पष्ट आहे. जनतेकडून पैसे गोळा करा, आपल्या श्रीमंत मित्राची
तिजोरी भरा.
ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, सातत्याने हे दर वाढवत आहे, या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर होत आहे. प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला आम्ही महागाई नियंत्रित ठेवत आहे, असे सांगितले. पण, नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा हे त्यांचे सूत्र आहे, त्याची राजकीय किंमत सत्ताधार्यांना योग्य वेळी कळेल.
शेजारी देशांच्या तुलनेत भारतात गॅसचे दर कमी! केंद्राचा दावा
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 29 रुपयांची वाढ झाल्यानंतर विरोधकांकडून टीका होत असताना, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने भारतातील एलपीजीचे दर शेजारील देशांच्या तुलनेत कमी असल्याचा दावा केला आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नव्या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 942 रुपये झाली आहे. पण भारताच्या शेजारील देशांमध्ये याच क्षमतेच्या सिलिंडरसाठी ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागत आहे. पाकिस्तानमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत सुमारे 1,046 रुपये असून, नेपाळमध्ये ती 1,207 रुपये आहे. बांगलादेशमध्ये ग्राहकांना 1,225 रुपये, तर श्रीलंकेत 1,241 रुपये मोजावे लागत आहेत. विकसित देशांमध्ये एलपीजीचे दर यापेक्षाही अधिक आहेत. अमेरिकेत 14.2 किलो समतुल्य घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सुमारे 1,755 रुपये असून, कॅनडामध्ये ती 2,411 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधन दर, आयात खर्च आणि चलन विनिमय दरातील चढ-उतार यांचा परिणाम एलपीजीच्या किमतींवर होत असला, तरी भारतातील घरगुती ग्राहकांना शेजारील देशांच्या तुलनेत स्वयंपाकाचा गॅस कमी दरात उपलब्ध होत असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.










