मुंबई – प्रसार भारतीमध्ये केंद्रीय कर्मचारी आणि प्रसार भारतीचे कर्मचारी असे दोन प्रकारचे कर्मचारी कार्यरत आहेत. ५ ऑक्टोबर २००७ पूर्वीच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेवेतील सर्व प्रकारचे लाभ मिळतात, मात्र २००७ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन, बढती आदींमध्ये सापत्न वागणूक दिली जाते, असा आरोप करत काल या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. दूरदर्शन केंद्र मुंबई आणि आकाशवाणी केंद्र, मुंबईच्या मुख्य गेटवर हे कर्मचारी एकत्र आले होते. मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने निदर्शने करण्यात आली. जॉइंट अॅक्शन फोरम फॉर प्रसार भारती एम्प्लॉइज (संयुक्त कृती मंच) या मंचाने या आंदोलनाचे आवाहन केले होते.
प्रसार भारती 23 नोव्हेंबर 1997 रोजी स्वायत्त संस्था म्हणून अस्तित्वात आली. ती अस्तित्वात आल्यानंतर प्रसार भारतीला त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार होती. त्यानुसार,2012 मध्ये प्रसार भारती कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीसह मंत्री गटाचा निर्णय लागू झाला.ज्यानुसार 5 ऑक्टोबर 2007 पूर्वी येथे कार्यरत असलेले कर्मचारी हे भारत सरकारचे कर्मचारी असतील आणि त्यानंतर सेवेत येणारे कर्मचारी हे प्रसार भारतीचे कर्मचारी म्हणून गणले जातील, असा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारे केंद्रीय कर्मचारी आणि प्रसार भारतीचे कर्मचारी, असे दोन प्रकारचे सरकारी कर्मचारी प्रसार भारतीमध्ये काम करू लागले.
सर्व कर्मचाऱ्यांना CGHS चा लाभ, समान पदासाठी समान वेतन, कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव न करता वेळेवर पदोन्नती, गट विम्याचे लाभ, कर्मचार्यांच्या सेवेच्या कालावधीत त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना कौटुंबिक निवृत्ती वेतन, नवीन पेन्शन योजना (NPS) मध्ये नियोक्त्यांद्वारे 14 टक्के योगदान त्वरित सुरू करावे आणि, 05 ऑक्टोबर 2007 ची “कट-ऑफ तारीख”, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव होतो ती समाप्त करावी, अशा प्रसार भारती कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.