मुंबई – गानकोकिळा लता मंगेशकर यांचे ९३ व्या वर्षी निधन झाल्यामुळे उद्या महाराष्ट्रात राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्या सोमवारी म्हाडाच्या ५६५ जागांसाठी भरती परीक्षा आहे. त्यामुळे उद्या परीक्षा होणार का असा संभ्रम विद्यार्थ्यांना पडला आहे. तर, ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा होणार आहेत.
राजकुमार सागर म्हणाले, “म्हाडा सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत अतांत्रिक संवर्गातील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांसाठी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा होईल. यानुसार सोमवारी (७ फेब्रुवारी) सकाळी ०९.०० ते ११.०० वाजेपर्यंत, दुपारी १२.३० ते २.३० वाजेपर्यंत, तर दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा तीन सत्रांत परीक्षा होणार आहे. याची सर्व अर्जदारांनी/परीक्षार्थींनी नोंद घ्यावी.”
दरम्यान, म्हाडातील १४ पदांच्या ५६५ रिक्त जागा भरण्यासाठी १२ ते २० डिसेंबरदरम्यान राज्यभर भरती परीक्षा होणार होती. त्यासाठी पावणे तीन लाख अर्ज आले होते. मात्र परीक्षेला काही तास शिल्लक असताना, मध्यरात्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले होते.
“प्रश्नपत्रिका फोडल्याच्या आरोपानंतर परीक्षा रद्द”
परीक्षा घेण्याचे कंत्राट असलेल्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीच्या एका संचालकाने प्रश्नपत्रिका फोडण्याचा डाव आखला होता. पुणे सायबर पोलिसांनी कारवाई करून कंपनीच्या संचालकाला आणि दलालांना अटक केले. या गैरप्रकारानंतर म्हाडाने स्वत: परीक्षा घ्यावात असे सरकारने जाहीर केले. त्यानुसार म्हाडाने ऑनलाइन परीक्षा घेण्याची तयारी केली आहे.