संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

नवाब मलिकांना आठ दिवसांची कोठडी, टेरर फंडींगच्या आरोपाखाली कारवाई

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी त्यांना आठ दिवसांची कोठडी सुनावली. आज सकाळी पाच वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू होती. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

अटक झाल्यानंतर नबाव मलिक यांना वैद्यकीय चाचणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथून त्यांना ईडीच्या स्पेशल कोर्टात हजर करण्यात आले. इथे त्यांच्या कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद झाले. खुद्द मलिक यांनी मला कोणतेही समन्स नव्हत, मला जबरदस्तीने येथे आणलयं, असा दावा न्यायालयात केला. मलिक यांनी गॅंगस्टर दाऊद इब्राहीमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते इब्राहीमला दिले, असा दावा करत हे `टेरर फंडिंग` असल्याचा युक्तिवाद केला. हा व्यवहार 1996 मध्ये झाला होता.

नवाब मलिक यांनी 1993 स्फोटातील आरोपीकडून कुर्ला भागात एक मालमत्ता खरेदी केली होती. कोट्यवधींची किंमत असलेली ही मालमत्ता नवाब मलिकांनी अवघ्या 30 लाखांत खरेदी केली होती, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 9 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला होता. या जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता.

मलिक यांचे वकिल अमित देसाई यांनी कोठडीस तीव्र विरोध केला. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाॅंडरिंग (PMLA) हा कठोर कायदा आहे. हा कायदा येण्यापूर्वी सहा वर्षे आधी म्हणजे 1996 मध्ये झालेल्या पाॅवर ऑफ अॅटर्नीचा उल्लेख ईडीकडून केला जात आहे. फौजदारी कायद्यात पूर्वलक्ष्यी प्रभावाने कारवाई करता येत नाही. तुम्ही वीस वर्षांनी जागे व्हाल आणि 14 दिवसांची पोलिस कोठडी मागाल, हे बरोबर नाही. या प्रकरणात गॅंगस्टर दाऊतविरोधात FIR कोणी पाहिलेला नाही. मलिक यांची दाऊद इब्राहीमशी लिंक असल्याच्या आरोपात तथ्य नाही. महाविकास आघाडीचा नेता राष्ट्रविरोधी कारवायांत सहभागी असल्याचे दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी हा सारा खटाटोप सुरू आहे, असा युक्तिवाद देसाई यांनी केला.

ज्या सलीम पटेलच्या आधारावर ईडी आरोप करत आहेत. या नावाच्या दोन व्यक्ती आहेत. एक सलीम पटेल याचा मृत्यू झाला आहे आणि दुसरा जिवंत आहे असा युक्तिवाद देसाईंनी केला. एक सलीम पटेल उर्फ फ्रूट आहे जो छोटा शकिलचा नातेवाईक आहे. ज्या सलीम पटेलकडून प्राॅपर्टी विकत घेतली आहे तो वेगळा आहे. नवाब मलिकांना अडकवण्यासाठी हे सारे तयार केले आहे. ईडीने रिमांड रिपोर्टमध्ये एका ठिकाणी नवाब मलिक यांनी प्राॅपर्टी हसीना पारकरकडून विकत घेतली असे म्हटलं आहे. दुसरीकडे नवाब मलिक यांनी प्राॅपर्टी मुनिरा प्लंबरकडून विकत घेतल्याचं लिहिलं आहे. ही दोन्ही वाक्ये कुठेही मेळ खात नाहीत. मुनिराची मालमत्ता सलीम पटेलने पाॅवर ऑफ अॅटर्नीद्वारे विकल्याचे म्हटले आहे. मग सलीम पटेलविरुद्ध आधी गुन्हा दाखल झाला आहे का, असा सवाल देसाई यांनी विचारला. उलट मग या ठिकाणी मलीक यांचीच फसवणूक झाली आहे. ज्याला अधिकार नव्हते त्याने मालमत्ता त्यांना विकली. या ठिकाणी मूळचा गुन्हा कुठे दाखल झाला आहे? तुम्ही (मुनिरा यांनी) सलीम पटेल याला भाडे घेण्याचे अधिकार दिले होते. त्याने ती जमीन विकली. तुम्ही वीस वर्षानंतर जाग्या झाल्या आहात. तुम्हाला गेली 15 वर्षे भाडे मिळाले नाही. तरी तुम्ही काही केले नाही. 2022 मध्ये तुम्ही गुन्हा कोणाविरोधात दाखल करता तर मलिक यांच्याविरोधात. या केसमध्ये इतर कोणावरही गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही. महत्वाचे म्हणजे हसीन पारकरचा भाऊ इक्बाल कासकरला दुसऱ्या गुन्ह्यात अटक झाली आहे, अशा विसंगती देसाई यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

दरम्यान, ”देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू” असा इशारा नवाब मलिक यांनी या अगोदर दिला होता.

काय आहे प्रकरण

9 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोप केले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी नवाब मलिकांचे संबंध असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. या पत्रकार परिषेद फडणवीस म्हणाले होते की, ‘मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास तीन एकर जागा आहे. एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची ही जागा होती. अत्यंत महागडी ही जागा होती. त्याची एक पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि शाहवली खान यांच्याकडे होती. या दोघांनी एलबीएस रोडवरची ही जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. ‘सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली आहे ती फराज मलिक यांनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे.’

1993 च्या बॉम्बस्फोटात दाऊदचा हात होता. दाऊदची बहिण हसीना पारकर तिचा फ्रंट मॊन शाहवली खान आहे. या शाहवली खानकडून नवाब मलिकांनी ही जागा अवघ्या 30 लाखांत विकत घेतली. ही जागा सॉलिडस या कंपनीने विकत घेतली आहे. ही कंपनी मलिकांच्या कुटुंबीयांची आहे. आरोप करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘2005 मध्ये जो व्यवहार झाला त्यावेळी तिथला दर काय होता? तर त्याच्या मागे पाईपलाईनच्या कच्च्या रोडवर 415 रूपये स्क्वेअर फूटने जागा घेतली ती मलिक कुटुंबाने घेतली होती. याच रोडवर एक जागा 2005 मध्ये एक जागा 2 हजार रूपये स्क्वेअर फूटने विकत घेतली आहे. सॉलिडसने याच वर्षी दोन अंडरवर्ल्डच्या लोकांकडून ही जमीन 25 रूपये स्क्वेअर फूटने घेतली आहे. मुंबईत उकिरड्याची जागाही 25 रूपये चौ. फुटाने घेतली असून 15 रूपये चौ. फुटाने पैसे दिले आहेत. आता प्रश्न हा आहे की मुंबईच्या गुन्हेगारांकडून ही जमीन का विकत घेतली गेली?’

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami