मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आज जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना २५ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. आता त्यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात येणार आहे. सांगण्यात येत आहे की, त्यांची चौकशी सुरु राहणार आहे. मनी लॉंडरिंग प्रकरणामुळे मलिकांना सध्या 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीच्या मलिकांना ईडीने अटक केली होती. विशेष म्हणजे नवाब मलिक यांच्या अटकेपासून महाराष्ट्रात सातत्याने राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी नेते मलिकांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा म्हणून आंदोलन करत आहेत. तर त्याचबरोबर राज्यात सत्तेतील अनेक नेते मलिक यांच्या अटकेविरोधात सातत्याने आंदोलन करत आहेत.
तथापि, ‘ईडी’कडून नवाब मलिक यांचे पूत्र फराझ मलिक यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याकडून जमीन खरेदी केली होती. त्यावेळी फराझ मलिक या व्यवहारात सहभाग होते. नवाब मलिक यांचे बंधू अस्लम मलिक आणि फराझ मलिक हे जमिनीच्या व्यवहाराचे पैसे देण्यासाठी हसीना पारकरच्या घरी गेले होते. हा जमिनीचा सौदा ५५ लाख रुपयांना झाला होता. फराझ मलिक यांनी हसीन पारकर यांचा पाच लाख रुपयांचा धनादेश आणि ५० लाख रुपये रोख दिले होते. त्यावेळी हसीना पारकरचा सहकारी सलीम पटेलही त्याठिकाणी उपस्थित होता. त्यामुळे आता या सगळ्याची माहिती घेण्यासाठी ईडीकडून फराझ मलिक यांची चौकशी होऊ शकते. त्यामुळे मलिक कुटुंबीय आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.