मुंबई – कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या संबंधित जमीन व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आज ईडीने अटक केली आहे. त्यामुळे त्यांना 14 दिवसांची कोठडी मिळावी याकरता ईडीकडून न्यायालयात मागणी करण्यात आली आहे. याकरता दोघांचीही बाजू न्यायालयात मांडण्यात आली. यावेळी मला कोणतेही समन्स न देता ईडीने कार्यालयात आणलं असा दावा नवाब मलिकांनी केला. तसंच, ज्या सलीम पटेलचा उल्लेख ईडीकडून केला जात आहे तो व्यक्ती हसिना पारकरचा ड्रायव्हर नसून दुसराच व्यक्ती असल्याचं मलिक म्हणाले.
नवाब मलिक म्हणाले की, ईडीचे अधिकारी सकाळीच माझ्या घरी आले. त्यांनी मला जबरदस्तीने ईडी कार्यालयात आणलं. यासाठी मला कोणताही समन्सही देण्यात आला नाही. कार्यालयात आणल्यानंतर माझी सही घेण्यात आली. तसेच, कोणत्या अधिकाराखाली ही कारवाई करण्यात आली याची माहितीही देण्यात आली नाही. ज्या सलीम पटेलचा उल्लेख ईडीकडून केला जातोय तो दुसराच व्यक्ती आहे. मलिकांनी जमीन खरेदी केली तो सलीम पटेल हा हसिना पारकरचा ड्रायव्हर नसून दुसराच व्यक्ती आहे, असा दावाही नवाब मलिकांनी कोर्टात केला आहे.
नवाब मलिकांचा युक्तीवाद झाल्यानंतर ईडीचाही युक्तीवाद ऐकण्यात आला. नवाब मलिकांचा थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध आहेत. त्याच्याशी संबंधित संपत्ती मलिकांनी खरेदी केली. हसिना पारकर ही दाऊदची बहिण असून तीच त्याची हस्तक आहे. तिच्या माध्यमातून दाऊद भारतात व्यवहार करतो. मलिकांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली कुर्ला येथील जमीन ही डी गँगच्या हस्तकांशी संबंधित आहे. हसिना पारकरचा ड्रायव्हर सलीम पटेलकडून मलिक यांच्या कुटुंबियांनी ही जमीन खरेदी केली. हे प्रकरण मनी लॉन्ड्रींग प्रकरणाशी संबंधित असल्याने मलिकांची 14 दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी ईडीने न्यायलायकाडे केली आहे.