अंबर किल्ल्यातील हत्ती सफारीच्या दरात कपात

जयपूर – राजस्थानातील अंबर किल्ल्यातील हत्ती सफारीच्या दरात एक हजाराची कपात करण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला असून त्या विरोधात हत्तीमालक न्यायालयात जाणार आहेत. राजस्थानात लवकरच सुरु होणारा पर्यटन हंगाम, राजस्थान गुंतवणूक परिषद व आयफा पुरस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हे दर कमी करण्यात आले आहेत.राजस्थानच्या पर्यटन विभागाने या हत्तीसफारीचा आढवा घेतल्यानंतर ही दरकपात केली आहे. या आधी या हत्तीसफारीसाठी अडीच हजार रुपये मोजावे लागत होते. १५ नोव्हेंबरपासून हे दर दीडहजार रुपये करण्यात आले आहेत. या संदर्भात पर्यटन विभागाने कोणतेही कारण दिलेले नसले तरी जादा दरामुळे पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याने ही कपात करण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात हत्ती मालक विकास समितीचे अध्यक्ष बालू खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की आम्हाला १३ वर्षांनंतर ही दरवाढ मिळाली होती. सध्याच्या मंदीच्या काळात नवे दर आमचे नुकसान करणारे आहे. त्यातही वाढत्या महागाईमुळे हत्तीच्या चाऱ्याच्या किंमतीतही वाढ झाली आहे. एका हत्तीच्या खाण्यासाठी दररोज तब्बल तीन हजार रुपये खर्च येत असतो. त्यामुळे सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा. हत्ती सफारीच्या दरांची फेररचना ऑक्टोबर मध्ये करण्यात आली होती. आम्ही या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत. सध्या अंबर किल्ल्यात ७५ हत्ती असून ते अंबर किल्ला व हत्ती गाव या ठिकाणाचे हे प्रमुख आकर्षण आहे.