अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी ‘एनसीबी’कडून ५ जणांना अटक

पुणे – एका आंतरराज्यीय टोळीतर्फे पुण्यामध्ये अमली पदार्थांची विक्री होत असल्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाने पुण्यातून तीन जणांना अटक केली आहे. हे अमली पदार्थ आंध्र प्रदेश आणि बिहार येथून पुण्यामध्ये आणल्याचे आढळले. पुण्याची रहिवासी असणारी सागर. बी. नावाची व्यक्ती अवैध औषधे व अमली पदार्थांच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती.

अधिकाऱ्यांनी सागरची चौकशी केली असता,त्याने या तस्करीची कबुली दिली आणि हे अमली पदार्थ स्वराज बी. नावाच्या व्यक्तीसाठी आणल्याची माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी स्वराजलाही ताब्यात घेतले. स्वराज याचे पुण्यात मेडिकलचे दुकान असून, त्या दुकानातूनच तो या अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे त्याने अधिकाऱ्यांना सांगितले. या प्रकरणात एनसीबीने आणखी एकाला अटक केले. तर, दुसऱ्या घटनेमध्ये मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी १ किलो कोकेनच्या तस्करीप्रकरणी गोव्यातून दोघांना अटक केली. यामध्ये एका परदेशी व्यक्तीचा समावेश आहे. केनियाचा रहिवासी असलेल्या सॅम्युअल नावाच्या व्यक्तीकडे अंमली पदार्थ असल्याचा संशय गोवा विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांना आला. त्याच्या सामानाची तपासणी केली असता, त्याच्याकडे १ किलो कोकेन असल्याचे आढळले. तो दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून दुबईमार्गे भारतात आला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी तातडीने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि त्यानंतर सॅम्युअलसह आणखी एका जणावर अटकेची कारवाई करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top