अजित पवारांचा अन्याय विरोधकांना निधी नाहीच

मुंबई- अजित पवार यांनी अर्थमंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांनी मंजूर केलेल्या आमदारांच्या विकास निधी वाटपावरून राजकारण तापले आहे. विधिमंडळात दोन्ही सभागृहात असमान निधी वाटपाचा हा मुद्दा जोरदार चर्चिला जात आहे. मात्र आता यात महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असले तरी दोन्ही गटातील आमदारांना घसघशीत निधी मिळाला आहे. कोट्यवधीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिंदे गटातील आमदारांना भरघोस निधी देऊन खूश केले गेले आहे तर ठाकरे आणि काँग्रेसच्या आमदारांना ठेंगा दाखवण्यात आला आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदारांना मंजूर झालेला निधी पुढीलप्रमाणे – 1) इंदापूरचे आमदार दत्ता भरणे – 436 कोटी, 2) वाईचे आमदार मकरंद पाटील – 291 कोटी, 3) अकोलेचे आमदार किरण लहामटे – 116 कोटी, 4) आंबेगावचे आमदार दिलीप वळसे-पाटील – 96 कोटी, 5) बारामतीचे आमदार अजित पवार – 73 कोटी, 6) श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे -40 कोटी, 7) सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे – 33 कोटी, 8) येवल्याचे आमदार छगन भुजबळ – 31 कोटी, 9) कागलचे आमदार हसन मुश्रीफ – 22 कोटी, 10) परळीचे आमदार धनंजय मुंडे – 21 कोटी, 11) गेवराईचे आमदार प्रकाश साळुंखे – 13 कोटी.
राष्ट्रवादीच्या विरोधी बाकांवरील आमदारांनाही निधी वाटपात घसघशीत लाभ झाला आहे. अजित पवार यांचे ज्यांच्याशी फारसे पटत नाही, त्या आमदार जयंत पाटील यांच्या वाळवा मतदारसंघात तब्बल 580 कोटी 31 लाखांचा निधी दिला गेला आहे. जयंत पाटील यांच्याबरोबरच घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांच्या मतदारसंघात 293 कोटींचा निधी दिला आहे. तर कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात 210 कोटी दिले गेले आहेत. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघात 35 कोटी दिले गेले आहेत.
दरम्यान काँग्रेसच्या 15 आमदारांच्या मतदारसंघात शून्य निधी दिला गेला आहे, तर 20 आमदारांच्या मतदारसंघात 1 ते 3 कोटी रुपये इतका निधी सरकारने मंजूर केला आहे. ठाकरे गटाच्या आमदारांचीही अवस्था अशीच आहे. 10 लाख ते 1 कोटी पर्यंत त्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top