अजित पवार-उद्धव ठाकरे दिल्लीत विधानसभा जागावाटपाच्या बैठका सुरू

नवी दिल्ली – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच महायुती आणि मविआ नेत्यांची जागावाटपासाठी धावाधाव सुरू झाली आहे. मित्रपक्षांशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले तर अमित शहा यांची भेट घेण्यासाठी अजित पवार मध्यरात्री दिल्लीला धावले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल रात्री नवी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.
गेल्या महिन्यात अमित शहा हे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनिमित्त पुणे दौर्‍यावर आले होते. यावेळी देखील अजित पवारांनी त्यांची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीचे जागावाटप लवकरात लवकर करण्याची विनंती केली होती. यानंतर काल रात्री पुन्हा अजित पवारांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने अद्याप जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केलेला नाही. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभेतही भाजपने महायुतीतील घटक पक्षांपेक्षा जास्त जागा लढवण्याची शक्यता आहे. भाजपाकडे सर्वाधिक 105 आमदार आहेत.
अजित पवार पक्षाच्या 18 विद्यमान आमदारांच्या मतदारसंघामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार यांची डोकेदुखी वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी 4 उमेदवार उभे केले. त्यापैकी एकच उमेदवार निवडून आला. त्यापैकी, केवळ रायगड लोकसभा मतदारसंघात त्यांना विजय मिळाला. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. जास्तीत जास्त जागा मिळवण्याचे आवाहन त्यांच्यापुढे असणार आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांच्या, मंत्र्यांच्या 18 मतदारसंघात बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यात मंत्री हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, आमदार सुनील शेळकर, सुनिल टिंगरे यांच्या मतदारसंघाचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ, दिंडोरी, कागल, इंदापूर, वडगाव शेरी, आष्टी, कोपरगाव, अहेरी, अकोले, पूसद, जुन्नर, वाई या मतदार संघात महायुतीमध्ये सध्या धुसफूस सुरु आहे. महायुतीमधील अनेक नेते हे निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. कारण, जागावाटपात भाजपाचे पारडे जड असून अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. या बंडखोरीच्या शक्यतेमुळे अजित पवार यांच्यासह महायुतीमधील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. त्यासाठीच अजित पवार हे आतापासून नियोजन
करीत आहेत.

पप्पांना सांगा, बांगलादेशातील अराजक थांबवा
उध्दव ठाकरेंची पंतप्रधानांवर टीका

पंतप्रधान मोदी युक्रेन आणि रशियाचे युद्ध थांबवू शकतात तर, पप्पांना सांगा हे युद्ध पण थांबवा अशी टीका उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या हल्ल्यावरून पंतप्रधानांवर टीका केली. उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय दिल्ली दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान त्यांच्या इंडिया आघाडीतील नेत्यांसोबत भेटीगाठी होत आहेत. त्यांनी काल काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांची भेट घेतली. तर आज काँग्रेस खासदार कल्याण काळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, समाजवादी पक्षाचे खासदार आदित्य यादव, खासदार विशाल पाटील आणि विश्वजित पाटील त्यांच्या भेटीला आले होते. त्यानंतर ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर मी दिल्लीत आलो नव्हतो, खासदारांना घरी भेटलो होतो. दिल्लीत आल्याने माझी अनेकांसोबत भेट झाली. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची अधिकृत बैठक झालेली नाही. अधिवेशन सुरु असल्याने इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे प्रमुख नेते दिल्लीत आहेत. त्यांची भेट घ्यायची आहे. येत्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे. अन्य काही राज्यात सुद्धा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी म्हणून एकसंघ लढायला पाहिजे. एकमेकांना सहकार्य आपण कसे घेऊ शकतो यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्यावर देखील भाष्य केले. ‘सर्वसामान्य जनता ही सगळ्यात मजबूत असते. त्यांच्या सहनशीलतेचा अंत राज्यकर्त्यांनी पाहू नये. तो जर पाहिला तर जनतेचे न्यायालय हे काय असते हे बांगलादेशच्या घटनेवरून स्पष्ट दिसते. बांगलादेशात हिंदूंवर जे हल्ले होत आहेत ते थांबवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. आम्ही तिकडे जाऊन काही करू अशी स्थिती नाही. काल याबाबाबत एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हते. कालची बैठक ही केवळ माहिती देण्यासाठी होती का? कालच्या बैठकीला काही अर्थ नव्हता. मणीपूर अजूनही पेटलेले आहे, काश्मिरी हिंदूची हत्या होत आहे, बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत असतील तर सरकारने पावले उचलली पाहिजेत. शेख हसीना यांना भारतात आश्रय देता, मग केंद्राने बांगलादेशमधील हिंदूंचे संरक्षण करावे. पंतप्रधान मोदी युक्रेन आणि रशियाचे युद्ध थांबवू शकतात तर, पप्पांना हे युद्ध पण थांबवायला सांगा . मला औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणणार्‍यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले अत्याचार थांबवून दाखवावेत. धारावीच्या मुद्यावरुन ठाकरे म्हणाले की, धारावीचा विकास झाला पाहिजे. विकासाच्या आड आम्ही येत नाही. धारावीकरांना त्याच ठिकाणी घर मिळाले पाहिजे ही शिवसेना उबाठाची भूमिका आहे. शरद पवार आणि अदानी यांची मैत्री आहे. अदानी माझेही शत्रू नाहीत. अदानी यांच्यासाठी टेंडरच्या बाहेरच्या काही गोष्टी आम्ही होऊ देणार नाही. धारावीच्या लोकांवर अपात्रतेचा शिक्का टाकून त्यांना दुसरीकडे फेकत असाल तर चालणार आहे. आमचे सरकार आल्यावर टेंडर बाहेरील सर्व गोष्टी आम्ही रद्द करु. जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू, मुंबईची विल्हेवाट कोणाला लावू देणार नाही. शरद पवार साहेब मुंबईची वाट लावू देणार नाहीत असा आपला विश्वास आहे.