अजित पवार महायुतीत नकोत! भाजपाची मागणी त्यांची मते मिळाली नाहीत! त्यांना घेतल्यामुळेच पराभव

मुंबई – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. त्यामुळे महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. अशातच भाजपाच्या बहुसंख्य आमदारांनी अपयशाचे खापर अजित पवार यांच्या माथी फोडले आहे. काही मतदारसंघांत अजित पवार गटाच्या आमदारांनी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना मदत केली नाही. अजित पवार गटांची मते भाजपाला मिळाली नाहीत. उलट त्यांना युतीत घेतल्याने अपयश आले, असा अहवाल भाजपाच्या या आमदारांनी पक्षाच्या महामंत्र्यांना दिला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही अजित पवार नकोत, अशीच भूमिका घेतली आहे. अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे लोकसभेत फटका बसला. अजित पवार गटाची मते भाजपाला मिळाली नाहीत. शिंदे गटालाही महायुतीतील या तिसर्‍या भिडूचा फायदा झाला नाही, असे या आमदारांचे म्हणणे आहे.
माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ आणि शिरूरसह अन्य अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवाराला अजित पवार गटाने मदत केली नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड विधानसभा मतदारसंघात दिलीप मोहिते-पाटील, जुन्नरमध्ये अतुल बेनके, आंबेगावमध्ये दिलीप वळसे- पाटील आणि हडपसरमध्ये चेतन तुपे हे अजित पवार गटाचे चार आमदार असताना शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव-पाटील पराभूत झाले. येथे महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे विजयी झाले. माढ्यातही अजित पवार गटाने युतीचा धर्म पाळला नाही. येथे शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपाच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा पराभव केला. मावळमध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विजयी झाले असले तरी ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांना लक्षणीय मते मिळाली. सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या राम सातपुते यांचा 74,000 मतांनी पराभव केला. दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे विजयी झाले. त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना पराभूत केले. हे अजित पवार गटाचे आमदार आणि कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना प्रचार, मदत न केल्यामुळेच झाले, अशी तक्रार या आमदारांनी महामंत्र्यांना पाठविलेल्या अहवालात केली आहे. ही धुसफूस वाढली तर विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजपाला मोठा निर्णय घ्यावा लागेल. दरम्यान, दादांना टार्गेट कराल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top