अटकेपासून बचावासाठी वानखेडेंनी शाहरुख खानबरोबरचे चॅट उघड केले

मुंबई- नार्कोटिक्स ब्युरो माजी झोनल प्रमुख समीर वानखेडे यांनी आज सीबीआयकडून अटकेपासून बचावासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आपण कर्तव्यदक्ष अधिकारी आहोत, हे सिद्ध करण्यासाठी सुपरस्टार शाहरुख खान याच्याशी केलेले खाजगी चॅट जगजाहीर केले. या चॅटमध्ये कुठेही पैशाच्या देवाणघेवाणीचा उल्लेख नाही, असा दावाही त्याचे वकील ॲड. रिजवान मर्चंट यांनी केला. शाहरुख खानशी केलेल्या चॅटमध्ये वानखेडे यांनी त्यांच्याच काही अधिकाऱ्यांवर आरोप करत म्हटले आहे की, मी नियमानुसार काम करत असलो तरी आमच्या काही स्वार्थी, हितसंबंधी आणि गुन्हेगारी वृत्तीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची वाट लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. यावर शाहरुखनेही म्हटले आहे की, या लोकांशी मी बोललो, त्यांना विनंती केली. उत्तरेतील माणसांशीही मी बोललो. ते त्यांच्या स्वार्थासाठी माझ्या मुलाला अडचणीत आणत आहेत. माझ्या मुलाला तुम्हीच वाचवा.
समीर वानखेडे यांनी आज उच्च न्यायालयाचे न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर आज तातडीच्या सुनावणीची मागणी केली आणि न्यायालयाने ही मागणी मान्य करून सुनावणी घेतली. त्यानंतर समीर वानखेडे यांना 22 मे पर्यंत अटकेपासून दिलासा मिळालेला आहे.
नार्कोटिक्स ब्युरो आणि सीबीआय यांनी निवेदन सादर केल्यानंतर 22 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. आज समीर वानखेडेंच्या बाजुंनी युक्तिवाद करताना वकील म्हणाले की, हे प्रकरण ऑक्टोबर 2021 चे आहे. ज्या दिवशी गुन्हा घडतो त्यानंतर चार महिन्यांत चौकशी पूर्ण करून एफआयआर दाखल करायचा, असा नार्कोटिक्स ब्युरोचा कायदा आहे. ही कालमर्यादा उलटून गेली आहे. तरीही आता वानखेडेंवर एफआयआर दाखल केलेला आहे. आज आम्ही शाहरुख खान आणि वानखेडे यांच्यात आर्यन खानच्या अटकेनंतर दुसऱ्या दिवशी रात्री झालेल्या चॅटची माहिती कोर्टासमोर सादर केलेली आहे. यात समीर वानखेडे हे कर्तव्याशी एकनिष्ठ असणारे अधिकारी आहेत, असे कौतुक शाहरुख खानने केले आहे. या संभाषणात पैशाचा एकदाही उल्लेख नाही. एक बाप आपल्या मुलाच्या सुटकेसाठी ज्या तळमळीने विनंती करेल त्यापद्धतीने शाहरुख खान विनंती करताना दिसत आहे. आपल्यासारखे अधिकारी या देशाला आवश्यक आहेत, असेही शाहरुख खान म्हणतो. या चॅटमध्ये समीर वानखेडे यांनी म्हटले आहे की, आर्यन खानला हा एक मोठा धडा आहे. यानंतर त्याने सुधारावे यासाठी माझे प्रयत्न आहेत. मी त्याहेतूने आर्यन खानशी बोलतही आहे. मात्र हे प्रकरण वेगळ्या वळणावर नेऊन चिखलफेक करण्याचा प्रकार काही अधिकारी करत आहेत. हे सर्व टाळण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. तु काळजी करू नको, हे प्रकरण लवकरच मिटेल.
समीर वानखेडे यांनी सीबीआयकडून अटकेपासून संरक्षण मागितले. त्यावेळी सीबीआयने त्याच्या विनंतीला विरोध करत न्यायालयात म्हटले की, समीर वानखेडेला चौकशीवेळी सहकार्य करत नाहीत. त्याच्या परदेशवारीबाबत नीट माहिती सांगत नाहीत. त्याला अटकपूर्व जामीन पाहिजे असेल तर त्याने रितसर सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करायला हवा. ते टाळून जर उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला तर तो त्याची ओळख आणि हुद्दा याचा फायदा घेऊन पुराव्यांशी छेडछाड करू शकतो आणि अनेकांवर दबावही आणू शकतो. न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकून 22 मे रोजी पुढील सुनावणी ठेवली असून तोपर्यंत समीर वानखेडे यांना अटक करता येणार नाही, असा
निर्णय दिला.
समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यात पहिले चॅट 3 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वाजून 37 मिनिटांच्या सुमारास झाले आहे. त्यात खालील संभाषण आहेः
शाहरुख खान : समीर साहेब, मी तुमच्यासोबत एक मिनिटांसाठी बोलू शकतो का? मला कल्पना आहे की, अशाप्रकारे बोलणे कदाचित पूर्णपणे चुकीचे आहे. मात्र, वडील म्हणून तुमच्याशी संवाद साधू शकतो का?
समीर वानखेडे: प्लीज कॉल.
शाहरुख खान: फोन करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का? धन्यवाद.
4 ऑक्टोबर 2021 रोजीही चॅटमधून दोघांमध्ये संभाषण झाले.
शाहरुख खान : तुम्ही माझ्याबद्दल व्यक्त केलेले विचार आणि वैयक्तिक माहितीसाठी मी तुमचे आभार मानू शकत नाही. आर्यन असा व्यक्ती होईल ज्याचा तुम्हाला आणि मला दोघांनाही अभिमान वाटेल. यासाठी मी प्रयत्न करेन. ही घटना त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल. मी वचन देतो, चांगल्या मार्गाने या देशाला पुढे नेण्यासाठी प्रामाणिक आणि कष्टाळू तरुणांची गरज आहे. तुम्ही आणि मी आमची भूमिका पार पाडली आहे आणि आता पुढच्या पिढीवर हे अवलंबून आहे की त्यांनी भविष्यासाठी कसे तयार व्हावे. तुमचा दयाळूपणा आणि समर्थनासाठी पुन्हा धन्यवाद. लव्ह डठघ.
वानखेडे : माझ्या शुभेच्छा आहेत.
शाहरुख : तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात…कृपया आज त्याच्यावर दया दाखवा..मी आपल्याला विनंती करतो…
वानखेडे : नक्कीच…ऊेप’ीं थूेीी…
शाहरुख खान: देव तुमचं भलं करो… जेव्हा तुम्ही म्हणाल, तेव्हा मला फक्त सांगा… मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटून मिठी मारायची आहे. तुमच्यासाठी जेव्हा सोयीचे असेल तेव्हा मला कृपया कळवा. तुमच्या कामाविषयी मला कायम आदर आहे आणि आदर राहील. बिग रिस्पेक्ट.
वानखेडे : नक्कीच आपण भेटुयात…आधी हे सगळं प्रकरण संपवूयात…
शाहरुख : त्याला तुरुंगात राहू देऊ नका, अशी मी विनंती करतो. तो तुरुंगात राहिला तर तो माणूस म्हणून मोडेल. त्याचा आंतरात्मा वेगळा विचार करेन. प्लीज मी भीक मागतो, तुम्ही त्याला तिथे जास्त दिवस ठेऊ नका. त्याला लवकर घरी पाठवा नाहीतर तो पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल. तुम्हालाही माहिती आहे, त्याच्यासोबत जरा जास्तच घडलंय… प्लीज प्लीज मी तुला बाप म्हणून भीक मागत आहे.
न्यायालयात वानखेडे यांच्या वकिलांनी हे चॅट सादर करून असा युक्तिवाद केला की, एक बाप दुसऱ्या बाजूला मुलाची काळजी घ्या म्हणून आर्जव करतो आहे. जर वानखेडे यांनी खंडणी मागितली असती तर शाहरुखने त्या मेसेजमध्ये पैशांचा उल्लेख केला असता. पण त्याने असा कोणताही उल्लेख न करता लेकाची काळजी घ्या, असाच सूर त्याच्या संबंधित मेसेजमध्ये होतो, असे वानखेडे यांच्या वकिलांनी सांगितले. न्यायालयाने समीर वानखेडे यांची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा देत 22 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top