अदानींच्या बनावट कंपन्यांत 20 हजार कोटी आहेत हा पैसा कुणाचा आहे? अदानी-मोदी यांचा संबंध काय?

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी काल रद्द झाल्यावर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत आक्रमकपणे पुन्हा सवाल केला की, अदानींच्या बनावट कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये आहेत ते कुणाचे आहेत? अदानी आणि मोदींचा संबंध काय? माझी खासदारकी कायमसाठी गेली तरी पर्वा नाही, मी हा सवाल विचारत राहणार आहे. राहुल गांधी यांची एकीकडे पत्रकार परिषद सुरू असताना त्यांनी ओबीसीचा अपमान केला, असा आरोप करीत भाजपाने देशभर जोरदार आंदोलने केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, देशात लोकशाहीवर आक्रमण होत आहे. याची आपल्याला दररोज नवी उदाहरणे पाहायला मिळत आहेत. मी संसदेत एकच प्रश्न विचारला होता. अदानी यांच्या शेल कंपन्या आहेत. त्यात 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? हा अदानींचा पैसा नाही. त्यांचा पायाभूत सुविधांचा व्यवसाय आहे. तर प्रश्न हा आहे की, हे 20 हजार कोटी रुपये कोणाचे? हा प्रश्न विचारल्यावर आधी भाजपाने माझे भाषण संसदेच्या कामकाजातून हटवले. मी प्रश्न विचारणे थांबवत नाही हे लक्षात आल्यावर भाजपाच्या सदस्यांनी माझ्यावरच आरोप केले. मी विदेशी शक्तींकडून मदत घेतली असे म्हणाले. त्यानंतर या संपूर्ण मुद्यावरून लक्ष हटवण्यासाठी माझ्यावर अवमानप्रकरणी कारवाई केली. अदानींकडे संरक्षण खात्याची कंत्राटे आहेत, त्यात एक चिनी व्यक्ती देखील आहे, ही व्यक्ती कोण आहे, त्याच्याकडे दहा विमानतळे आहेत. अशा माणसाकडे पैसा कुठून येतो हे विचारायला नको का? मोदी आणि अदानी यांचा काय संबंध आहे ते एक दिवस उघड होईलच. विरोधी पक्ष त्यासाठी सतत दबाव आणणार आहे
मी अदानींवर पुढचे भाषण काय करणार याची भीती भाजपाला होती. ती भीती नरेंद्र मोदींच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती, असे सांगत राहुल यांनी पुढे स्पष्ट केले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी काही बोलत नाही. माझा आक्षेप गौतम अदानींवर आहे. अदानी भ्रष्ट व्यक्ती आहे हे सिद्ध झाले आहे. प्रश्न हा आहे की, या भ्रष्ट व्यक्तीला केंद्र सरकार का वाचवत आहे? भाजपाच्या काही लोकांनी सांगितले की अदानींवर आक्रमण म्हणजे देशावर आक्रमण आहे. त्यांना अदानी म्हणजे देश वाटतो यातूनच काय ते समजावे. या देशातली लोकशाही संपली आहे. देशावर, देशाच्या लोकशाहीवर आक्रमण होते आहे आणि मोदी-अदानी हे याचे मेकॅनिझम आहे, असे राहुल म्हणाले.
आपण कोणतेही आरोप पुराव्यांशिवाय केलेले नाहीत, असे राहुल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, मी संसदेत पुरावे दिले. अदानी आणि मोदींच्या संबंधाबाबत विस्तृतपणे बोललो. हे संबंध जुने आहेत. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासूनचे हे संबंध आहेत. मोदी विमानात अदानींसोबत निवांत बसलेली छायाचित्रे मी दाखवली. ऑस्ट्रेलियाच्या स्टेट बँकेत मोदी बसल्याचे चित्र मी दाखवले तेव्हा माझे भाषण संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले. मी एअरपोर्ट नियम बदलून अदानींना देण्यात आले हे सांगितले. नियमांची कॉपी दाखवली. यावर कोणतीच कारवाई
झाली नाही.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, संसदेचा नियम आहे की, एखाद्या सदस्यावर कोणी आक्षेप घेतला तर त्या सदस्याला आपले म्हणणे मांडता येते.
मी याबाबत सतत दोन पत्रे दिली, पण त्यांना उत्तर मिळाले नाही. लोकसभा अध्यक्षांना भेटलो तरी मला बोलू देण्याची विनंती केली. त्यावर ते हसत म्हणाले, तुम्ही या आणि माझ्याशी निवांत गप्पा मारा, पण तुमच्या मागणीबाबत मी काही करू शकत नाही.
त्यानंतर काय घडले ते तुम्ही पाहिले. पण मी प्रश्न विचारणे बंद करणार नाही. मला अपात्र करून, तुरुंगात टाकून माझे तोंड बंद करू शकत नाही. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहणार. कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. हे सत्य आहे.
तुम्हाला संसदेत, न्यायालयात न्याय मिळाला नाही तर तुमची पुढील रणनिती काय असेल, तुम्ही जनतेत जाणार का, असे विचारता राहुल म्हणाले, भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून मी जनतेमध्येच होतो आणि यापुढेही जाईन. जो पूर्वी राजकीय पक्षांना पाठिंबा मिळत होता, आजच्या हिंदुस्थानात मिळत नाही. त्यामुळे नेत्यांना जनतेत जाण्याशिवाय पर्याय नाही. दरम्यान, ओबीसी समाजाबद्दल अनुद्गार काढलेले नाहीत, असेही राहुल यांनी स्पष्ट केले.

माफी मागण्यासाठी
मी सावरकर नाही

राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी संसदेत वारंवार होत होती, मग तुम्ही माफी का मागत नाही असे पत्रकारांनी विचारल्यावर माफी मागण्यासाठी मी सावरकर नाही, गांधी आहे, असा टोला राहुल यांनी लगावला.

उद्या काँग्रेसचे देशभरात
’संविधान बचाओ’ आंदोलन

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष सोमवारी दिल्लीसह देशातील प्रत्येक राज्यांत ‘संविधान बचाओ आंदोलन’ करणार आहे. या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते रस्त्यावर उतरणार आहेत. जयराम रमेश म्हणाले की, ‘तालुका आणि जिल्हास्तरापासून ते देशाच्या राजधानीपर्यंत ‘संविधान बचाओ आंदोलन’ उभारले जाणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही महाराष्ट्रात सोमवारी मोठे आंदोलन करून मोदी सरकारविरोधात आवाज उठवणार असल्याचे जाहीर केले. आता काँग्रेसच्या या आंदोलनाकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे.

Scroll to Top