मुंबई- आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी भाजपा हॉकर्स युनिटने दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात फेरिवालांची बैठक बोलवली होती. फेरीवाल्यांचे रोजीरोटीचे साधन हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही तुमच्या बाजूने लढा देऊ, अधिकृत फेरीवाल्यांच्या समस्या कायमच्या सोडवू,असे आश्वासन मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी फेरिवालांना या बैठकीत दिले.
आशिष शेलार म्हणाले की,‘मुंबईतील गुन्हेगारी थांबली पाहिजे, यासाठी कायदा व्यवस्थेला फेरीवाले पोलिसांना मदत करतात. अधिकृत फेरीवाले खरे मुंबईकर आहेत. आम्ही अनधिकृत फेरीवाल्यांची बाजू कधीच घेत नाही. या फेरीवाल्यांमुळे मुंबईकरांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागतो. सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या धोरणानुसार फेरीवाल्याना त्यांचे संविधानिक अधिकार मिळाले पाहिजेत, याआधीच फेरीवाला धोरण अंमलबजावणी अपेक्षित होती. याबाबत मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा झाली आहे. महाविकास आघाडी काळात व्हेडिंग कमिटीच्या निवडणुका झाल्या नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना निवडणुका झाल्या असत्या तर आज ही स्थिती उद्भवली नसती.फेरीवाल्या बांधवांसाठी कायदेशीर लढाईसाठी वकील म्हणून मी स्वतः उभा राहणार आहे.`