धुळे- शिरपूर तालुक्यातील अभयारण्य म्हणून घोषित करून राखीव ठेवलेल्या अनेर अभयारण्यात साधा उंदीरही बिळ करून राहत नाही.पण त्यामुळे इथल्या ग्रामीण भागातील आदिवासी समाजाच्या विकासाला खीळ बसली आहे.यासाठी मी या अभयारण्याचा दर्जा रद्द करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करणार आहे ,असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी तालुक्यातील लौकी येथे केले.
शिरपूर तालुक्यातील लौकी येथे आदिवासी विकास विभागातर्फे बांधल्या जाणार्या एकलव्य निवासी आश्रमशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मंत्री गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री गावीत हे बोलत होते. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित पुढे म्हणाले की, आदिवासी विभागाने राज्यात जिथे जागा उपलब्ध होईल तिथे पुढील दोन वर्षात आश्रमशाळा आणि वसतिगृहे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आदिवासी समाजाच्या विकासासाठी गाव आणि पाडे एकमेकांना बारमाही रस्त्यांनी जोडली जातील असे गावीत म्हणाले. यावेळी भाजपच्या खासदार हिना गावीत, आमदार कांशीराम पावरा, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे ,जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील तसेच अन्य प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि लौकीच्या सरपंच अक्काबाई भिल व ग्रामस्थ उपस्थित होते.
अनेर अभयारण्याचा दर्जा रद्द करण्याचा प्रयत्न करणार! मंत्री गावितांचे प्रतिपादन
