मुंबई
शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगितले होते. याही सुनावणीही लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. वडेट्टीवार यांनी याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्रही दिले आहे.
‘महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरु आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानेही अनेक महत्वपूर्ण निष्कर्ष नोंदवत हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आले. विधानसभा अध्यक्ष या नात्याने आपण एका संवैधनिक पदावर विराजमान आहात. या प्रकरणाबाबत आपण कसा न्याय देणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. बंडखोर आमदारांवर नेमकी काय कारवाई होणार हे महाराष्ट्राला कळणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर संवैधानिक संस्था, संवैधानिक पद आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे आपण लाईव्ह प्रक्षेपण करावे.’ अशी मागणी वडेट्टीवार यांनी पत्राद्वारे केली आहे.