देहरादून – अमरनाथ यात्रेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ही यात्रा यंदा १ जुलैपासून सुरू होणार असून ती ३१ ऑगस्टपर्यंत एकूण ६२ दिवस चालणार आहे. या यात्रेची नोंदणी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने केली जाईल. ती १७ एप्रिलपासून सुरू होईल.
श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथच्या वार्षिक यात्रेची व्यवस्था करते. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले की, प्रशासन सुरळीत आणि त्रासमुक्त तीर्थयात्रा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. भाविकांना चांगली आरोग्य सेवा आणि इतर आवश्यक सुविधा दिल्या जातील. यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी दूरसंचार सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. यात्रेचे दोन्ही मार्ग अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम ट्रॅक आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल येथून सुरू होतील. सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीचे थेट प्रक्षेपणही केले जाईल.