अमित शहा-मुख्यमंत्री रोड शोमध्ये एकत्र

बेळगाव – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते सीमावर्ती भागात एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी निवडणूक प्रचार करत आहेत. मात्र भाजपाने या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार उभे केल्याने भाजपशी जवळीक निर्माण झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमाभागात प्रचारासाठी न जाता किनारी भागात जाऊन भाजपा उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. त्यांचा प्रचार दौरा जाहीर झाला आहे ज्यात ते अमित शहा यांच्या रोड शो वेळी उपस्थित राहणार आहेत.
एकनाथ शिंदे आजपासून पुढील 2 दिवस कर्नाटकात असतील. बंगळुरूसह मध्य आणि दक्षिण कर्नाटकातल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये ते भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करतील. महत्त्वाचे म्हणजे बंगळुरूमध्ये एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत.
कर्नाटक निवडणुकीच्या मैदानात शिंदे गटाने एकही उमेदवार उतरवलेला नाही, तरी देखील शिंदे यांचा तीन दिवसांचा कर्नाटक दौरा असल्याने याबाबत राजकीय चर्चा होत आहे. उद्या चांदपुरा सर्कल ते इग्गालुरू हासुर मेन रोडवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रोड शोमध्ये एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. शिंदे रविवारी सकाळी 6.30 ते 8 दरम्यान बंगळुरू येथील कबोन पार्क येथील मतदारांसोबत चालत संवाद साधणार आहेत. यानंतर सकाळी 9:30 ते 10:30 डोड्डा गणपती मंदिर, बसवनागुडी, बंगळुरू येथे श्रीगणेशाच्या मंदिराला भेट देऊन पूजा व दर्शन घेतील. सायंकाळी 4 नंतर बंगळुरू येथे रोड शो मध्ये सहभागी होतील. यानंतर रात्री 8 वाजता बंगळुरू विमानतळावरून मंगळुरूकडे प्रस्थान करतील.
सोमवारी सकाळी 9 नंतर हेलिकॉप्टरने मंगळुरू येथून धर्मस्थळाकडे रवाना होतील. तिथे श्री मंजुनाथ स्वामी मंदिराला भेट देऊन पूजा आणि दर्शन करणार आणि धर्मस्थळ संस्थानचे धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांची भेट घेणार आहेत. दुपारी 3 वाजता उडपी जिल्ह्यातील कापू विधानसभा मतदारसंघात तर दुपारी 4 वाजता उडपी विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी काढण्यात येणार्‍या रोड शो मध्ये सहभागी होतील. संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपवून उडपीहून हेलिकॉप्टरने मंगळुरूला परतणार आणि रात्री 9 वाजता मंगळुरू विमानतळाकडे प्रस्थान करून मुंबईकडे रवाना होणार.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top