मुंबई
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. राजाचे दर्शन आणि विद्यापीठातील एका कार्यक्रमासाठी ते आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. दुपारी २.४० मिनिटांनी त्यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर आधी आमदार आशिष शेलार यांच्या वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेऊन ते लालबागच्या दिशेने रवाना झाले.
अमित शाह सुमारे १५ मिनिटे लालबागच्या राजाच्या दरबारात होते. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस देखील त्यांच्यासोबत होते. शाह यांच्या दौऱ्यानिमित्त काळाचौकी पोलीस ठाणे पासून ते लालबागचा मुख्यद्वार पर्यंत सीआरपीएफ मुंबई पोलीस, रॅपिड ऍक्शन फोर्स तसेच लालबाग परिसरामधील पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. शहा यांच्या दौरा असलेल्या सर्व मार्गावर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली.
लालबाग राजाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. तेथून त्यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर शहा यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत काही वेळ चर्चा केली. संध्याकाळी शहा यांनी सहकार चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ लक्ष्मणराव इनामदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुंबई विद्यापीठात आयोजित एका व्याख्यानात सहभाग घेतला आणि ते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.