अमेरिकन अभिनेता मॅथ्थ्यू पॅरी मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक

लॉस एजंलिस – फ्रेंडस या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अमेरिकन अभिनेता मॅथ्थ्यू पॅरी याच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्याच्या मृत्यूमागे अंमली पदार्थाच्या तस्करीचे मोठे रॅकेट असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.अभिनेता मॅथ्थ्यू पॅरी याचे गेल्या वर्षी २८ ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. त्याच्या शवविच्छेदनात त्याचा मृत्यू कॅटेमाईन या अंमली पदार्थाच्या अतिरिक्त सेवनामुळे झाल्याचे उघड झाले. अमेरिकन पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी यंदाच्या मे महिन्यात सुरु केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी काल पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या पाच जणांनी पॅरीच्या व्यसनाचा वापर पैसे कमावण्याकरता केला असे पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्यांमध्ये पॅरीचा व्यक्तीगत सहाय्यक, दोन डॉक्टर व कॅटेमाईनची राणी म्हणून ओळख असलेल्या एका महिलेचा व तिच्या सहाय्यकाचा समावेश आहे. पॅरीचा मृत्यू झाला त्यावेळी त्याच्या शरीरात सापडलेल्या कॅटेमाईनचे प्रमाण सर्वसाधारणपणे रुग्णांला भूल देतांना वापरण्यात येते इतके होते . पॅरीच्या सहाय्यकाने दोन डॉक्टरांना हाताशी धरुन त्याला ५० हजार डॉलर किंमतीचे कॅटेमाईन विकले होते असेही तपासात आढळून आले आहे. वैद्यकीय कारणाशिवाय कॅटेमाईन दिल्याचा आरोप डॉक्टरांवर ठेवण्यात आला असून त्यांनीच पॅरीच्या सहायकाला कॅटेमाईन कसे टोचायचे याचेही प्रशिक्षण दिले होते. पॅरीच्या मृत्यूपूर्वीच्या चार दिवसांत त्याला कॅटेमाईनचे २७ शॉट्स देण्यात आले होते. जसवीन सांघा या महिलेला कॅटेमाईन पुरवल्याबद्दल अटक करण्यात आली असून अंमली पदार्थांच्या तस्करीच्या वर्तुळात ती कॅटेमाईन क्विन म्हणून ओळखली जाते. आपल्या एका सहायकाच्या मदतीने तिने या कॅटेमाईनचा पुरवठा केला होता.