अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पायउतार करणार?

न्यूयॉर्क – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपला पुत्र हंटर बायडन याच्या आर्थिक फायद्यासाठी काही निर्णय घेतले, असा गंभीर आरोप होऊन त्याचे काही पुरावे मिळाल्यानंतर त्यांना राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार करण्यासाठी महाभियोग चालविला जाण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिकेत खळबळ माजली आहे.
जो बायडन यांच्या ज्येष्ठ पुत्राचे निधन झाले असून, त्यांचा धाकटा पुत्र हंटर बायडन हा सतत कोणत्या ना कोणत्या वादात सापडत आला आहे. अंमली पदार्थांचे सेवन, अतिरेकी मद्यपान याबरोबरच चीन व युक्रेन यांच्याशी अत्यंत संशयास्पद असे व्यवहार केल्याचे आरोप त्याच्यावर सतत होत आहेत. या व्यवहारातून त्याला प्रचंड मोठा आर्थिक लाभ झाल्याचाही आरोप आहे. यात जो बायडनची त्याला साथ असल्याचे पुरावे मिळत असल्याने आता जो बायडन संकटात सापडला आहे. अमेरिकेच्या संसदेत वरच्या सभागृहात स्पीकर असलेले केवेन मॅकार्थी यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या कुटुंबाचे परकीय राष्ट्राशी असलेले आर्थिक व्यवहार पाहता त्यांच्यावर महाभियोग चालविला जाऊ शकतो. जो बायडन यांनी सतत सांगितले आहे की, मी उपराष्ट्राध्यक्ष असताना आणि आता राष्ट्राध्यक्ष असतानाही चीन वा युक्रेन यांच्याकडून मला कोणताही आर्थिक लाभ झालेला नाही. मात्र हा दावा असत्य असल्याचे आता उघड झाले आहे.
हंटर बायडन हा चिनी कंपनी बीएचआर पार्टनर्समध्ये 2013 ते 2016 दरम्यान संचालक पदावर होता. त्यानंतर त्याने या कंपनीत 10 टक्के भागिदारीही मिळविली. अमेरिकेतील नैसर्गिक वायू प्रकल्पातही त्याची चिनी अब्जाधीश जियानमिंग याच्याशी भागिदारी होती. यामुळेच जो बायडन यांनी चीनविरोधात कायम नमती भूमिका घेतली, असा आरोप डोनाल्ड ट्रम्पपासून अनेकांनी केलेला आहे. युक्रेनबाबतही हंटरवर असा आरोप आहे की, युक्रेनची नैसर्गिक वायू कंपनी बुरिस्मा होल्डिंग्ज याची चौकशी होऊ नये यासाठी व्हिक्टर शोकींन याला चौकशी अधिकारी पदावरून काढण्यासाठी जो बायडन यांनी प्रयत्न केले आणि त्यासाठी हंटर बायडनला दरमहिना 50 हजार डॉलर दिले जात होते. याबाबतचा पुरावा एफबीआयकडे असल्याचे सांगितले जाते. हंटर बायडनच्या कंपनीने 2013 ते 2018 दरम्यान अब्जावधीचे करार चीन व युक्रेनमधील कंपन्यांशी केलेलेही आढळले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top