न्यूयॉर्क: भारताप्रमाणे आता अमेरिकेतही दिवाळीला सरकारी सुट्टी असेल. यासाठी न्यूयॉर्कच्या विधानसभेत कायदा करण्यात येणार आहे. न्यूयॉर्कच्या विधानसभेत प्रस्ताव मांडण्यात आला असून, त्यानंतर दिवाळीला सुट्टी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याचबरोबर न्यूयॉर्क अधिवेशनात दिवाळी व्यतिरिक्त लूनर न्यू ईयरच्या सरकारी सुट्टीच्या प्रस्तावाला देखील मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.
न्यूयॉर्क असेंब्लीचे अध्यक्ष कार्ल हॅस्टी यांनी एक निवेदन जारी करून या घटनेला दुजोरा दिला. या प्रस्तावाचे कारण अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांचा वाढता प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच न्यूयॉर्कची समृद्ध, वैविध्यपूर्ण संस्कृती जोपासण्यासाठी आणि त्याची ओळख पुढच्या पिढीला करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी लुनर न्यू इअर आणि दिवाळीला विधानसभेत सुट्टी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाईल, असेही ते म्हणाले. न्यूयॉर्क असेंब्लीचे अधिवेशन ८ जूनपर्यंत चालणार आहे. या प्रस्तावाला ‘दिवाली डे अॅक्ट’ असे नाव देण्यात आले आहे. दिवाळीची सुट्टी न्यूयॉर्कमधील १२वी सरकारी सुट्टी असेल. याचा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या समुदायाला खूप फायदा होईल आणि ते आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत दिवाळीचा सण साजरा करू शकतील.
न्यूयॉर्क असेंब्ली वुमन जेनिफर राजकुमार आणि सिनेटर जो अडाबो यांनी न्यूयॉर्क शहरातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती. न्यूयॉर्क स्टेट कौन्सिल मेंबर शेखर कृष्णन आणि कौन्सिल वुमन लिंडा ली यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता.