अमेरिकेत व्याजदरात वाढ 22 वर्षांचा उच्चांक

वॉशिंग्टन- फेडरल बँक ऑफ अमेरिकाने या अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली. बँकेने 12 बैठकांमध्ये 11व्यांदा व्याजदर वाढवला असून, हा व्याजदर 22 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. यापूर्वी जानेवारी 2001 मध्ये सर्वाधिक व्याजदर होते.
जुलैच्या पतधोरण आढावा बैठकीत बँकेने व्याजदरात वाढ जाहीर केली. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 टक्के वाढ केली. यामुळे व्याजदर 5.25-5.50 टक्क्यांच्या श्रेणीत आला आहे. चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी आणि महागाईला तोंड देण्यासाठी मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढवले आहेत.
फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत सर्व सदस्यांनी दर वाढवण्याच्या बाजूनी मतदान केले. फेडरल रिझर्व्हने व्याजदर आणखी वाढवण्याचे संकेत दिलेले नाहीत. तरीही व्याजदरात वाढ होईल, असा अंदाज अर्थतज्ज्ञ वर्तवत आहेत. सप्टेंबरच्या बैठकीत दर वाढवण्याचा निर्णय आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असेल, असे फेडरल रिझर्व्हने म्हटले आहे.
फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले की, व्याजदर वाढीचा पूर्ण परिणाम काय होईल हे कळायचे आहे. महागाईचा ताण अजूनही कायम आहे. फेडरल रिझर्व्हचे मुख्य लक्ष्य महागाई कमी करणे आहे. महागाई दर पूर्वीच्या 2 टक्क्यांपर्यंत खाली येत नाही, तोपर्यंत बँक व्याजदरात वाढ करत राहील असे बोलले जाते .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top