प्योंगयांन – हुकुमशाह किम जोग उनच्या आदेशानुसार उत्तर कोरियामध्ये गेल्या काही दिवसांपासून लष्करी ताकद वाढवली जात असताना आज सकाळी अमेरिकेला इशारा देण्यासाठी उत्तर कोरिया लष्कराने पुन्हा एकदा समुद्राच्या वायव्य दिशेने एक लहान पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. या आठवड्यात आतापर्यंत उत्तर कोरियाने तिसऱ्यांदा क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे.
अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये जवळीक वाढली आहे. या दोन्ही देशांच्या लष्कराने गेल्या सोमवारी संयुक्त लष्करी कवायती सुरू केली. त्यामुळे हुकुमशाह किम जोग उन चांगलाच भडकला आहे. त्याच्या आदेशावरुन आज पुन्हा एकदा उत्तर कोरिया लष्कराकडून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. जपानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की,‘सकाळी उत्तर कोरियाने एक संशयित क्षेपणास्त्राचा मारा केला. क्षेपणास्त्र जपानच्या क्षेत्रात आले नाही.`
किम जोंग उनकडून युद्धाची जोरदार तयारी सुरु असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील मैत्रीपूर्ण संबंध वाढत असताना गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात तणाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे उत्तर कोरिया अमेरिकेला इशारा देण्यासाठी क्षेपणास्त्र चाचणी करत असल्याची जोरदार चर्चा आहे.