अयोध्या- अयोध्येत श्री राम मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. राम भक्तांनी प्रभू रामचंद्रांची मूर्ती जिथे बसवण्यात येईल ते आसन सोन्याने मढवण्यात येणार आहे, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे वरिष्ठ सदस्य डॉक्टर अनिल मिश्रा यांनी दिली. प्रभू रामाची मूर्ती तयार करण्यासाठी ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांच्यासोबतची टीम युद्धपातळीवर तयारी करत आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत मूर्ती तयार होईल, असा विश्वास ट्रस्टकडून व्यक्त करण्यात आला.
प्रभू रामचंद्राच्या मूर्तीसाठी आणलेल्या दगडी शिळेवर काम सुरू आहे. यासाठी कर्नाटकसह बंगळुरूच्या ५ मूर्तिकारांची टीम अयोध्येत दाखल झाली आहे. कर्नाटकातील म्हैसूरहून आलेल्या दगडी शिळेवर श्रीरामाची मूर्ती कोरण्यात येणार आहे. राम मंदिरातील रामचंद्रांची स्थापन होणारी मूर्ती बाल्यावस्थेतील रुपात आहे. या मूर्तीच्या हातात धनुष्य आणि बाण असेल तर डोक्यावर मुकुट असणार आहे.