साल्वाडोर: मध्य अमेरिकेतील अल साल्वाडोर स्टेडियममध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. अलियान्झा व एफएएस हे मध्य अमेरिकन देशातील सर्वाधिक लोकप्रिय फुटबॉल संघ आहेत. या दोन संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरु होता. हा सामना पाहण्यासाठी गेटवर मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी ही घटना घडली.
सामना पाहण्यासाठी चाहत्यांकडून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत अनेकजण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात ९ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये ७ पुरुष व २ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत ५०० जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. काही जणांवर मैदानावर उपचार करण्यात आले. काही लोक अजूनही बोगद्यात अडकले आहेत. तर १०० हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे बचाव कमांडो कार्लोस फुएन्टेस यांनी सांगितले. सामना सुरू झाल्यांनतर काही प्रेक्षक जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न करत असताना, अवघ्या १६ मिनिटांतच ही दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर सामना रद्द करण्यात आला. स्टेडियमबाहेर आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली असल्याचे साल्वाडोरचे आरोग्य मंत्री फ्रान्सिस्को अल्बी यांनी सांगितले.