अ‍ॅड. सदावर्तेना हायकोर्टाचा दणका
कारवाई स्थगिती मागणी फेटाळली

मुंबई- मराठा आरक्षण सुनावणी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी आक्षेपार्ह विधाने केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र वकील परिषदेने अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईला स्थगिती द्यावी अशी मागणी सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. मात्र त्यांच्या मागणी याचिके संदर्भात न्यायालयाने सदावर्ते यांनाच फटकारले आणि त्यांची मागणीही फेटाळून लावली.
सदावर्ते यांच्या स्थगिती मागणी याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने सदावर्ते यांचा समाचार घेत म्हटले की, तुम्ही वकील आहात म्हणून तुम्हाला वेगळी वागणूक दिली जाणार नाही, तुम्हाला बार काऊन्सिलच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही. तसेच तुम्हाला हवी तशी आम्ही सुनावणी घेणार नाही,असे म्हणत सदावर्ते यांची मागणी फेटाळून लावत याचिका दाखल करून घेतली.यावेळी सदावर्ते यांचे वकील अ‍ॅड.सुभाष झा यांनी बार काऊन्सिलबाबत केलेल्या काही आरोपांचीही न्यायालयाने गंभीर दाखल घेतली. न्यायालयाने सुनावणीवेळी बार काऊन्सिलने सदावर्ते यांच्यावर केलेल्या नोटीस पाठविण्याच्या कारवाईचे समर्थन केले आणि तुम्हाला बार काऊन्सिल विरोधात चुकीचे बोलण्याचा अधिकार नसल्याचे सदावर्ते यांना ठणकावून सांगितले. बार काऊन्सिलचे वकील अ‍ॅड.मिलिंद साठे यांनी सदावर्ते यांच्या विरोधात एक तक्रार फेटाळली असल्याचे सांगत पहिल्या तक्रारीवरून कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

Scroll to Top