मुंबई
महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक तथा माजी नगरसेवक मनोज संसारे यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. मनोज हे गेल्या वर्षभरापासून आजारी होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त करण्यात आली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत संसारे यांना श्रद्धांजली वाहिली.
दलित पँथरचे नेते भाई संगारे यांचे निकटवर्तीय म्हणून मनोज संसारे यांना ओळखले जायचे. आंबेडकरी चळवळीतील विचारवंत आणि झुंजार लढवय्या म्हणून दलित पँथरमध्ये मनोज यांची ख्याती होती. ते ‘युथ रिपब्लिकन पार्टी’चे राष्ट्रीय अध्यक्ष होते. संसारे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.