आंबेडकरी चळवळीतील प्रा. कुमुद पावडे यांचे निधन

नागपूर –

आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत, लेखिका, अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रा. कुमुद पावडे यांचे आज निधन झाले. त्या दीर्घकाळ आजारी होत्या. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पावडे पश्चात कृषी अर्थतज्ज्ञ व शेती प्रश्नाचे अभ्यासक डॉ. अमिताभ पावडे, डॉ. अभिजित पावडे, डॉ. अपूर्व पावडे ही तीन मुले व अपर्णा चायंदे ही विवाहित मुलगी असा परिवार आहे.

कुमुद यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. माहेरच्या कुमुद सोमकुवर यांनी १७ एप्रिल १९६२ रोजी मराठा समाजातील गांधीवादी कार्यकर्ते मोतीराम गुलाबराव पावडे यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. वयाच्या १४ व्या वर्षांपासून त्यांनी लेखनाला सुरूवात केली. अस्मितादर्श, स्री, किर्लोस्कर, साधना, चौफेर इत्यादी मासिकातून विपुल वैचारिक लेखन केले. त्यांनी गेल्या ६० वर्षांत आंबेडकरी विचारविश्वात लेखनाने आपले स्थान निर्माण केले. त्यांनी ३६ वर्षे संस्कृतचे अध्यापन केले. द्वारका मठाधीश शंकराचार्यांच्या हस्ते त्यांना महाराष्ट्र शासनाचा संस्कृत पंडित पुरस्कार मिळाला. त्या अनेक कार्यकर्ते अन् अभ्यासकांच्या प्रेरणास्रोत होत्या. विदर्भातील आंबेडकरी चळवळ त्यांच्या नेतृत्वात बहरली. ‘अंत:स्फोट’ या त्यांच्या वैचारिक लेखांच्या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. १९६२ पासून त्या आंतरजातीय विवाहांसाठी काम करीत होत्या. नॅशनल फेडरेशन ऑफ दलित विमेनच्या संयोजक म्हणूनही त्यांनी काम केले. १९९२ पासून २००६ पर्यंत जगभरातील विविध देशांमध्ये अभ्यास दौरेही केले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top