रियाध : सौदी अरेबिया आणि ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यापासून कच्च्या तेलाच्या उत्पादनात दररोज सुमारे १.१६ दशलक्ष बॅरल कपात करण्याची घोषणा केली आहे. मे २०२३ च्या अखेरपर्यंत तेल उत्पादनात दररोज पाच लाख बॅरलने कपात करण्यात येईल असे सौदी अरेबियाकडून सांगण्यात आले आहे. मात्र सध्या वाढत्या महागाईच्या काळात तेल निर्यातदार देशांकडून उचलण्यात आलेले हे पाऊल जगासह भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.
सौदी अरेबियासह, इराणसारख्या इतर काही तेल उत्पादक देशांनीही तेल उत्पादनात एकूण १.१५ दशलक्ष बॅरल कपात करण्याची घोषणा केली आहे. यामुळे कच्च्या तेलात आजची ८ टक्क्यांची उसळी एका वर्षानंतर एका दिवसात दिसली आहे. तसेच या घोषणेनंतर आशियाई बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत ५ ते ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सौदी अरेबियाने तेल बाजार स्थिर करण्याच्या उद्देशाने उचललेले हे \’सावधगिरीचे पाऊल\’ असे म्हटले असले तरी यानंतर रियाध आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण होऊ शकतो. ओपेक देशांच्या या निर्णयावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे.
कच्च्या तेलाच्या उत्पादनात होणाऱ्या कपातीमध्ये रियाध प्रतिदिन ५ लाख बॅरलने कमी करणार असल्याचे म्हटले आहे, तर इराक प्रतिदिन २.११ लाख बॅरल तेलाचे उत्पादन कमी करेल. यूएई दररोज १.४४ लाख बॅरल तर कुवेतकडून १.२८ लाख बॅरल प्रतिदिन कमी करण्याची घोषणा केली आहे. ओमानने ४० हजार बॅरल प्रतिदिन कपात जाहीर केली आहे, अल्जेरियाने ४८ हजार बॅरल प्रतिदिन कपात जाहीर केली आहे. कझाकस्तानने दररोज ७८ हजार बॅरलची कपात जाहीर केली आहे. रशिया देखील ५ दशलक्ष बॅरल उत्पादन कमी करेल.