आज तरी एकत्र आहोत, उद्याचे काय सांगू? शरद पवारांच्या भूमिकेने ‘मविआ’त खळबळ

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणखी एक गुगली टाकली. त्यांनी अमरावतीत असे म्हटले की, ‘महाविकास आघाडीची एकत्र लढण्याची इच्छा आहे. पण फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचे वाटप, त्यात काही अडचणी आहेत की नाहीत यावर अजून चर्चा केलीच नाही. त्यामुळे आता याबद्दल कसे सांगता येईल?’ या वक्तव्यावरून खळबळ उडाल्यानंतर सोमवारी शरद पवार यांनी ‘आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला’, असे स्पष्टीकरण देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु राजकीय वर्तुळात शरद पवार याचे वक्तव्य अत्यंत सूचक मानले जात आहे.
महाविकास आघाडी आगामी निवडणूक एकत्र लढणार की नाही, हा विषय वरचेवर चर्चेला येत असतो. एकत्र निवडणूक लढवली तर भाजपला पराभूत करणे शक्य होईल, असे महाविकास आघाडीचे नेते म्हणत असतात. शरद पवार यांचाही सूर असाच असतो. मात्र रविवारी ते अमरावती दौर्र्‍यावर गेले असताना पत्रकारांनी त्यांना,‘2024 ची विधानसभा महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार का’, असा प्रश्‍न विचारला, तेव्हा वेगळा सूरही लावत त्यांनी उत्तर दिले की, ‘आज एकत्र असलो, तरी उद्याचे आता सांगता येणार नाही.’
शरद पवारांच्या विधानावर चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्नेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रतिक्रिया देत म्हणाले, ‘भाजपाच्या विरोधात जे राजकीय पक्ष आहेत, त्यांना एकत्र घेऊन लढण्याची काँग्रेसची भूमिका आहे. आमच्याबरोबर युतीत असलेल्या लोकांचे विचार वेगळे असू शकतात. मात्र, देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. देशाचे वाटोळे करण्याचे काम सुरू आहे. शेतकरी, तरुण पिढीला उद्ध्वस्त केले जात आहे. महागाई आणि गरिबीमुळे लोक त्रस्त आहेत. या परिस्थितीत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. जे आमच्याबरोबर राहतील, त्यांना घेऊन लोकशाही वाचवण्याची लढाई आम्ही लढू.’
शिवसेना खासदार संजय राऊत यावर म्हणाले की, ‘शरद पवारांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढला जातोय. सध्या महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. महाविकास आघाडीच्या एकत्र सभा आम्ही कशासाठी घेतोय? आम्ही एकत्र आहोत हे सांगण्यासाठीच. 1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची ऐतिहासिक सभा होत आहे. त्या सभेला तिन्ही पक्ष एकत्र येऊन तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. पुणे, कोल्हापूर येथेही सभा होणार आहेत.’
‘आपण तिघे एकत्र राहिलो, तर 2024 मध्ये आपण भाजपचा पराभव करू आणि लोकसभा निवडणूक मोठ्या संख्येने जिंकू, ही पवारांची भूमिका आहे. महाविकास आघाडीबाबत तुम्ही म्हणताय तशी त्यांची भूमिका असेल असे वाटत नाही. कारण आम्ही सातत्याने त्यांच्याशी चर्चा करत असतो. आताच थोड्यावेळापूर्वी शरद पवार यांच्याशी बोललो. त्यांच्या बोलण्यातून आघाडी नसावी किंवा तुटावी असं वाटत नाही’, असेही राऊत म्हणाले.
पवार यांच्या या विधानाचे पडसाद महाविकास आघाडीत उमटू लागल्यानंतर शरद पवार यांनीही सोमवारी असा खुलासा केला की, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. या विधानाचा विपर्यास करायला नको होता. आघाडीत अजून जागावाटपाची चर्चा झालेली नाही. आघाडी एकत्र राहावी, अशीच आमची इच्छा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top