आता बेस्ट बसमध्ये मोबाईलवर मोठमोठ्याने बोलल्यास कारवाई

मुंबई – बेस्ट बसने प्रवास करत असताना आता मोबाईलवर मोठमोठ्याने बोलणे किंवा गाणी वाजवणे महागात पडू शकते.कारण आता मुंबईत बसमध्ये मोठमोठ्याने फोनवर बोलण्यास मनाई करण्यात आली आहे.प्रसंगी संबंधित प्रवाशावर कायदेशीर पोलीस कारवाईसुद्धा केली जाणार आहे.

आपल्या शेजारच्या सहप्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच याबाबत पोलिसांमध्ये तक्रार करण्याचे आदेश ‘बेस्ट’ प्रशासनाने दिले आहेत. मुंबईत ‘बेस्ट’ बसमधून प्रवास करताना काही प्रवासी मोबाइलवरून अन्य व्यक्तीशी मोठया आवाजात संभाषण करीत असतात. काहीजण मोठ्या आवाजात गाणी ऐकतात. याचा सहप्रवासी तसेच वाहक आणि चालकांनाही त्रास सहन करावा लागतो. वाहकाने प्रवाशाला समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही.बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाकडे याबाबत मोठया प्रमाणात तक्रारी आल्या होत्या.त्यांची दखल घेऊन मोबाइलवर मोठया आवाजात बोलणाऱ्या वा गाणी ऐकणाऱ्या प्रवाशांना अद्दल घडविण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता २४ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार मोबाइलचा लाऊडस्पीकर वापरणाऱ्यांना समज देण्याची सूचना चालक, वाहक आणि तिकीट तपासनीसांना करण्यात आली आहे.संबंधित प्रवासी वाद घालत असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे. सहप्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी बोलताना, गाणी ऐकताना इयर-फोनचा वापर करण्याचे आवाहन ‘बेस्ट’ने केले आहे.दरम्यान,या नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास प्रवाशांवर पोलिस कायद्यानुसार कलम ३८/ ११२ अन्वये कारवाई करण्यात येईल.याबाबतचे परिपत्रक बेस्टच्या सर्व बसेसमध्ये लवकरच लावण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा बेस्टच्या बसने प्रवास करत असाल, तर मोबाईलवर जरा जपूनच बोलणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top