माथेरान
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज माथेरानचा दौरा केला. यावेळी त्यांनी अमन लॉज ते माथेरान असा फुलराणी या मिनीट्रेनमधून प्रवास केला. त्यांच्या स्वागतासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्याचबरोबर अनेक पर्यटकही त्यांना पाहण्यासाठी जमले होते. ‘माथेरान हिल स्पोर्ट्स क्लब आज लॉन्च करत आहोत. मुंबई फुटबॉल असोसिएशनच्या २४ टीम येथे येऊन खेळून गेल्या त्या सगळ्यांना भेटण्यासाठी, बक्षीस समारंभासाठी आणि खेळासाठी मी येथे आलो आहे.’ असे आदित्य यांनी म्हटले.
‘या स्पोर्ट्स क्लबमध्ये क्रिकेट, फुटबॉल सारखे खेळ सुरू करू. मुलांना खेळण्याची संधी देणे खूप महत्त्वाचे आहे. २०१७-१८ च्या वेळी इथे आलो तेव्हा देखील इथल्या मुलांना खूप मजा आली होती. मुळात मैदानी खेळ सतत खेळले गेले पाहिजेत. त्यासाठी प्रोत्साहन द्यायलामी येथे आलो आहे असेही ते म्हणाले. उद्धव साहेबांनी इथे ४२ कोटींचा पहिला निधी दिला होता. त्यातून अनेक रस्ते अनेक पॉईंट्स, टाऊन हॉल, लायब्ररी यांचे नूतनीकरण झाले. माथेरान किंवा महाबळेश्वर या दोन्ही ठिकाणी डागडूजीची गरज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र करायचे आहे. अनेक चांगल्या गोष्टी झाल्या आहेत. पुढे जात असताना अशा काही चांगल्या गोष्टी पर्यटकांसाठी होणे गरजेचे आहे. एमटीडीसी हॉटेल सोबत जॉईंट वेंचर करायचे होते, ते अडकले आहे. हे सरकार आल्यानंतर काही गोष्टींना स्थगिती दिली आहे. मात्र, पुन्हा एकदा आमचे सरकार आल्यानंतर चांगल्या गोष्टींना आम्ही प्रगतीपथावर आणणार आहोत, आमचे सरकार पडायच्या काही महिने आधी इथे आलो होतो. त्यावेळी ज्या कामांना सुरुवात केली होती तीही लवकरच पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.