नाशिक – आदिवासी विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या धान खरेदीत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला गोंधळ व होत असलेला गैरव्यवहार टाळण्यासाठी चालू आर्थिक वर्षापासून धान खरेदी ऑनलाईन केली जाणार आहे.त्याचप्रमाणे या खरेदीचे पैसे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यातच वर्ग करण्याचा निर्णय राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
याशिवाय यंदा बाळ हिरडा देखील खरेदी करण्याचे ठरविण्यात आले.महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक शासकीय विश्रामगृह येथे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. दरवर्षी आदिवासी विकास महामंडळाकडून आदिवासी शेतकऱ्यांकडून लाखो क्विंटल धान खरेदी केली जात असली तरी, अलीकडेच शहापूर तालुका तसेच गडचिरोली जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार धान खरेदीत उघडकीस आला असून, आदिवासी विकास महामंडळाचे प्रकल्प अधिकारी,खरेदी केंद्रांच्या संस्थांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आदिवासींची धानखरेदी ऑनलाईन होणार!
