अमरावती – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीत भाजप २८८ पैकी २४० जागा लढवणार असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे शिंदे गटाला केवळ विधानसभेच्या केवळ ४८ जागाच मिळणार असल्याचे दिसून येत आहे. बावनकुळे यांच्या या विधानामुळे शिंदे गटात एकच चलबिचल सुरू झाली आहे.आता या मुद्द्यावर आमदार बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.कडू म्हणाले की, आम्ही सध्या शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे.पुढील युतीचे काही ठरलेले नाही. अमरावती येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
बच्चू कडू पुढे असेही म्हणाले की,भाजपने नुकताच युतीचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. मात्र यात शिंदे आणि भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या लहान पक्षांचा उल्लेख नाही. आम्ही सध्या शिंदे सरकारला पाठिंबा दिलेला आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये युती करायची की नाही करायची, आम्हाला किती जागा देणार त्याचे अजून काही ठरलेले नाही.तसेच कोणी किती जागा लढवायच्या हा शिवसेना आणि भाजपचा व्यक्तिगत प्रश्न आहे.आमची शिंदे गट आणि भाजपशी युती नाही. आमचा फक्त सरकारला पाठिंबा आहे.जेव्हा युती होईल तेव्हा पाहू,
तसेच बावनकुळे यांनी केलेले वक्तव्य हे खरे आहे की चुकून त्यांचे शब्द निघाले हे पण तपासले पाहिजे. पण आम्ही सध्या शिंदे सरकारला पाठिंबा दिलेला आहे युतीच अजून काही आमचे ठरलेले नाही ते येणारा काळ पाहून ठरवू असे सुचक विधान बच्चू कडू यांनी केले आहे. दरम्यान,बच्चू कडू पुढे म्हणाले,पुढल्या दीड वर्षात काय होते त्याचे आता काहीच सांगता येत नाही, या पाच वर्षात तीन मुख्यमंत्री बदलले, तीन वेळा शपथविधी झाले पुढल्या दीड वर्षात काय होणार हे सांगता येत नाही असे सूचक वक्तव्य केले.