आमठाणे धरण परिसरात सुरक्षारक्षक नियुक्त करा

डिचोली – डिचोली आमठाणे येथील नागरिकांनी आमठाणे धरण परिसरात सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली आहे. या धरणात सावरधाट धनगरवाडी येथील संगीता बाबलो शिंगाडी (४५) या महिलेचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर येथील स्थानिकांनी धरण परिसरात सुरक्षारक्षक ठेवण्याची मागणी केली. संगीता पाणी पिण्यासाठी या धरणात उतरल्या होत्या. यावेळी अचानक मगरीने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना पाण्यात खेचून नेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस व डिचोली अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बोटीच्या साहाय्याने धरणात महिलेचा शोध घेतला. काही वेळानंतर त्यांचा मृतदेह सापडला.

या घटनेमुळे सावरघाट परिसरात शोककळा पसरली. संगीता यांच्या पतीचे दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्या मेंढ्यांचे पालन करून आपल्या तीन मुलांचा उदरनिर्वाह करत होत्या. आता त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज असून सरकारने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी झिलू वरक या स्थानिक युवकाने केली. दरम्यान, आमठाणे धरणात साळ नदीतून पंपिंग करून पाणी साठवले जाते. त्यामुळे धरणात बाराही महिने पाणी असते. धरणाच्या दुसऱ्या बाजूने नागरिक पाणी पिण्यासाठी, स्नानासाठी पाण्यात उतरतात. या धरण परिसरात गेल्या काही वर्षांतील ही तिसरी घटना आहे. या धरणात मगरीचा वावर असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मगरीच्या हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये, नागरिकांचे हकनाक बळी जाऊ नयेत यासाठी या परिसरात सुरक्षारक्षक नेमावा तसेच संरक्षणव्यवस्था उभारावी, अशी मागणी स्थानिकांनी केली. दरम्यान, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला. शिंगाडी कुटुंबियांना सरकार दरबारी सर्व ती मदत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top