मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवल्यानंतर आज उद्धव ठाकरे गटाने घाईने हालचाली करत अध्यक्ष राहुल नार्वेकर भारतात नसतानाही विधानभवन गाठले आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना न्यायालयाच्या निर्णयाची प्रत आणि तातडीने अपात्रतेबाबत निर्णय घेण्याची मागणी करणारे 79 पानी निवेदन दिले. अध्यक्ष राहुल नार्वेकर विदेश दौर्यावर होते, म्हणून उपाध्यक्ष झिरवळांना पत्र देण्यात आले.
विशेष म्हणजे आज दुपारीच राहुल नार्वेकर हे लंडनहून परतणार हे माहीत असूनही ठाकरे गटाने इतकी लगबग केली. आज निवेदन देण्याऐवजी उद्या निवेदन देता आले असते. आता उपाध्यक्ष नरहरी झिरवळांना निवेदन दिल्यावर उद्या किंवा परवा परत विधानभवनात जाऊन ठाकरे गट हेच निवेदन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देणार आहे. कारण निर्णय नार्वेकर घेणार आहेत. झिरवळांची त्यात काहीच भूमिका नाही. आज ठाकरे गटाने जे निवेदन दिले ते झिरवळ फक्त अध्यक्षांपर्यंत पोहोचवतील. त्यापलीकडे त्यांना अधिकारच नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्ष संदर्भातील निर्णय आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून पुढची रणनीती ठरवली जात आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांनी आज विधान भवन येथे जाऊन हा निर्णय तातडीने घ्यावा असे निवेदन आणि सोबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत झिरवाळांना दिली. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळात अनिल परब, सुनील प्रभू, सचिन अहिर, मनीषा कायंदे, सुनील राऊत आदींचा समावेश होता. यानंतर आमदार सुनील प्रभू यांनी माध्यमांना सांगितले की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला, त्यानुसार अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आम्ही केली. त्यासाठी विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे पत्र दिले. पत्राद्वारे विनंती केली की लवकरात लवकर सुनावणी घ्या आणि निर्णय घ्या. अध्यक्ष उपस्थित नसल्याने आम्ही उपाध्यक्षांना पत्र दिले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान भवनात आल्यानंतर लवकरच त्यांना भेटून पुन्हा एकदा विधानभवनात येऊन आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली जाईल, असं सुद्धा ठाकरे गटाच्या आमदारांकडून सांगण्यात आले. दुपारी अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबईत दाखल झाले. ते म्हणाले की, ‘अपात्रतेसंदर्भातील याचिकांवर लवकरात लवकर सुनावणी घेऊ. पक्षाचे प्रतिनिधित्व नेमके कोण करत होते, याची माहिती घेऊन त्यानंतर कार्यवाही करून निर्णय घेणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्व
निर्देश लक्षात घेण्यात येतील. घाई करणार नाही आणि विनाकारण विलंबही करणार नाही. कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्णय घेणार. कायद्यातील तरतुदींनुसार निर्णय घेणार. प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण झाली तर 15 दिवसात घेऊ. प्रक्रियेला विलंब झाला तर त्यानंतर घेऊ.’ भरत गोगावलेंना ज्यांनी प्रतोद म्हणून नियुक्त केले ती व्यक्ती की ज्यांनी सुनील प्रभूंना प्रतोद म्हणून नेमले ती व्यक्ती राजकीय पक्षाचे नेतृत्व करत होती, हे पाहावे लागणार आहे, अशी टिप्पणी देखील नार्वेकर यांनी केली. ठाकरे गटाने पत्र उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे दिले, याकडे लक्ष वेधल्यावर नार्वेकर म्हणाले, ’अध्यक्षांचे कार्यालय रिक्त असल्यास अधिकार उपाध्यक्षांकडे असतात. त्याव्यतिरिक्त उपाध्यक्षांकडे अधिकार
येत नाहीत.’
दरम्यान, घाईने निर्णय घेणार नाही आणि विलंबही करणार नाही, असे म्हणताना नेमका किती वेळात निर्णयाप्रत येणार हे मात्र राहुल
नार्वेकरांनी गुलदस्त्यात ठेवले. योग्य वेळेत निर्णय घ्या असे न्यायालयाने सांगितले असले तरी नेमका वेळ सांगितलेला नाही. त्यामुळे हा वेळ नेमका किती याबाबत प्रश्नचिन्ह आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, योग्य वेळेत म्हणजे तीन महिन्यांत असा आतापर्यंतचा प्रवाह आहे.
आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घ्या ठाकरे गटाची निवेदनाची घाई का?
