सांगोला – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज सांगोला येथे बाबूरावजी गायकवाड यांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने ‘माझी वाटचाल’ या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन व सत्कार समारंभाला उपस्थित होते. या कार्यक्रमात शहाजीबापू पाटील हे शरद पवार यांच्याबरोबर कुजबूज करताना दिसले. तसेच त्यांनी पवारांवर जाहीर स्तुतिसुमने उधळल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. हे दोघे आज एकाच मंचावर आले. या कार्यक्रमामध्ये शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. पवारांबद्दल बोलत असताना शहाजीबापू पाटील भावूक झाले. मी आज पवारसाहेबांना तब्बल दहा वर्षांनी भेटतो आहे. मी आमदार असताना शरद पवारांनी अख्खा दिवस मला दिला होता. त्यांनी सांगोला तालुक्यामध्ये माझ्यासोबत बरेच कार्यक्रम केले होते. आज मला या कार्यक्रमाला बोलावले नसते, तरी मी पवारसाहेबांचे दर्शन घेण्यासाठी आलो असतो, असे सांगत आमदार शहाजीबापू पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. पवारांवर जहरी टीका करणारे पाटील आज पवारांबद्दल स्तुतिसुमने उधळल्याचे पाहून उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त झाले.
आमदार शहाजी पाटील यांची शरद पवारांवर स्तुतिसुमने
