नवी दिल्ली –
भारतीय नौदलाकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आल्यानंतर आता भारतीय नौदलाच्या आयएनएस मोरमुगाओ या नव्या युद्धनौकेवरून आणखी एका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राने टार्गेटचा वेध घेतला. हे एक अत्याधुनिक क्षेपणास्त्र असून, समुद्र पातळीवरून उड्डाण करून ते समुद्रावर तरंगणाऱ्या लक्ष्याचा अचूक वेध घेते. याला सी स्किमिंग म्हणतात. या चाचणीमुळे भारतीय नौदलाच्या मारक क्षमतेत अनेक पटीने वाढ झाली आहे.
भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने आयएनएस मोरमुगाओ तयार केली आहे. ही जगातील सर्वात आधुनिक क्षेपणास्त्रवाहक युद्धनौका आहे. तिच्यावरून ३०० किमी अंतरावरील टार्गेटचा अचूक वेध घेता येतो. सी स्किमिंग ही उड्डाणाची एक पद्धत आहे. त्यात क्षेपणास्त्र किंवा विमान पाण्याच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळून म्हणजे साधारणतः १० फूटांहून कमी उंचीवरून उड्डाण करते. या तंत्रज्ञानाचा लष्करी व नागरी उद्देशांसाठी वापर केला जातो. पाण्यात उतरण्यासाठी किंवा उड्डाण करण्यासाठीदेखील या युद्धनौकेवरील विमानांचा वापर केला जातो. आधी ब्रह्मोस आणि आता सी स्किमिंग क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर मोरमुगाओ युद्धनौका अधिकच विध्वंसक बनली आहे.