मुंबई – कुलाबा ते सीप्झ दरम्यानच्या प्रस्तावित मेट्रो- ३ प्रकल्पातील आरे कार डेपोचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पासाठी १२४ झाडे तोडून त्यांच्या प्रत्यारोपणाला वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिली. आरे कार डेपोचे काम ५४ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे एप्रिलपासून मेट्रोचे रॅक येण्यास सुरुवात होणार आहे. सध्या बांधकाम, रेल्वे रुळ टाकणे, ओव्हरहेड वायर यंत्रणा बसवणे, ऑपरेशन कंट्रोल सेंटर बिल्डींग, वर्कशॉप, ॲक्सेस कंट्रोल बिल्डींग, आरे / सारीपूत नगर स्टेशन, भुयारी पाण्याच्या टाक्या इत्यादी कामे सुरू आहेत.
या डेपोत ९ मार्ग टाकण्याचे काम सुरू आहे. नोव्हेंबरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण होणार आहेत. या संपूर्ण मार्गावर ३१ रेल्वे गाड्या दाखल होणार आहेत. प्रत्येक महिन्यात दोन गाड्या येणार आहेत. या गाड्या आंध्रातील श्री सिटीतील अल्स्टाम कंपनीने बनवल्या आहेत. डिसेंबर २०२३ च्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक सुरू करण्यासाठी ९ गाड्यांची आवश्यकता असेल, असे एमएमआरसीचे संचालक सुबोध गुप्ता यांनी सांगितले. या मार्गावरील पहिली गाडी जुलै २०२२ मध्ये, तर दुसरी गाडी डिसेंबर २०२२ मध्ये आली होती. येत्या जूनपर्यंत रेल्वे रुळ टाकण्याचे काम पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसीतील वाहतूक सुरू केली जाईल. त्यानंतर जुलै २०२४ पासून हा मार्ग पूर्णपणे खुला होईल, असेही ते म्हणाले.