पुणे :
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी आल्याची आवक ७०० गोण्यांनी घटली. बाजारातील आवकेसह मागणीही घटल्याने आल्याचे गत आठवड्यातील भाव टिकून राहिले. घाऊक बाजारात आल्याच्या दहा किलोला ५०० ते १००० रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात आल्याची ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री सुरू होती.
राज्याच्या विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम अन्य फळभाज्यांच्या आवकेवरही झाला. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने श्रावणी घेवड्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. तर, मागणीअभावी टोमॅटो, हिरवी मिरची, ढोबळी मिरची व शेवग्याच्या भावात घसरण झाली. बाकी सर्व फळभाज्यांचे भाव टिकून होते.