गुवाहाटी : आसामच्या विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने कहर केला आहे. गारपीट आणि प्रचंड गडगडाटासह झालेल्या वादळात दोन जणांचा मृत्यू झाला असून, १४४ गावांतील ४१,४०० हून अधिक लोक बाधित झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि वादळामुळे झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्या प्रशासनाकडून आज सोमवारी २४ एप्रिल रोजी येथील सर्व शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आली होती.
वादळ आणि पावसामुळे अनेक घरांचेही नुकसान झाल्याचे आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे. तर येथील अनेक कच्या घरांसह पक्क्या घरांचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. गोलपारा जिल्ह्यातील बंदरमाथा भागात वीज पडून पाच गायींचा मृत्यू झाला आहे.तर गारपिटीमुळे धातूच्या पत्र्यांना छिद्र पडली आहे. परिणामी बोंगाईगाव जिल्ह्यातील दंगताल महसूल विभागांतर्गत घिलागुरी, दाबली आणि दिगदरी गावांमधील घरांच्या छताला गळती लागली आहे. धुबरी जिल्ह्यातील २४ गावांना वादळाचा फटका बसला आहे. शनिवार, रविवारी जोरदार वारा आणि गारपिटीमुळे येथे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय तिनसुकिया जिल्ह्याच्या उपायुक्तांनी घेतला असून, जिल्हा प्रशासनाने सोमवारी २४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.