नवी दिल्ली – इंडिगो विमान कंपनीकडून १ जूनपासून हैदराबाद, इंदूर व अहमदाबादसाठी नियमितपणे विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नाशिककरांना आता अहमदाबादसाठी दोन विमाने उपलब्ध होतील.
इंडिगो कंपनीकडून विमानसेवेचा विस्तार करताना नाशिकला प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार हैदराबाद व इंदूरसाठी नवीन विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय इंडिगो विमान कंपनीकडून घेण्यात आला. अहमदाबादसाठी यापूर्वी एक विमान फेरी नियमितपणे सुरू आहे. आता आणखी एक विमान फेरी सुरू केली जाणार आहे. हैदराबादहून सकाळी साडेअकरा वाजता नाशिकसाठी विमानाचे उड्डाण होईल. साडेबारा वाजता ते नाशिकच्या ओझर विमानतळावर पोचेल. हैदराबादला जाण्यासाठी नाशिकहून पावणेदोन वाजता उड्डाण होईल व दुपारी साडेचार वाजता हैदराबाद विमानतळावर पोहोचेल. इंदूरहून नाशिकसाठी १ वाजून पंधरा मिनिटांनी विमानाचे उड्डाण होईल. ते २ वाजून २५ मिनिटांनी नाशिकच्या ओझर विमानतळावर विमान पोचेल. त्यानंतर ओझर विमानतळावरूनच १२.५० मिनिटांनी इंदूरसाठी विमान उड्डाण होईल. दुपारी दोन वाजता इंदूरला विमान पोचेल. अहमदाबादहून सकाळी आठ वाजता नाशिकसाठी विमानाचे उड्डाण होईल. ९.२५ मिनिटांनी ओझर विमानतळावर विमान पोचेल. नाशिकहून सकाळी ९.४५ वाजता अहमदाबादसाठी उड्डाण होईल व ११.०५ वाजता ते अहमदाबादला पोहोचेल, अशी माहिती इंडिगो कंपनीकडून देण्यात आली.