इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून
६४ वर्षीय महिलेची आत्महत्या

मुंबई- दादर पश्चिम मधील इमारतीच्या छतावरून उडी मारून ६४ वर्षीय महिलेने बुधवारी आत्महत्या केली. ही महिला कर्करोगाने त्रस्त असल्याने मानसिकरित्या खचली होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. या घटनेची दादर पोलिसांनी नोंद घेतली.
रोहिणी रमेश पाटील असे या महिलेचे नाव होते. त्या दादर पश्चिम मधील साईकृपा इमारतीत कुटुंबा सोबत राहात होत्या. या सात मजली इमारतीच्या गच्चीवर त्या रोज सकाळी फेरफटका मारण्यासाठी जात असत. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी त्या गच्चीवर गेल्या. त्यानंतर काही वेळाने इमारतीखाली त्यांचा मृतदेह सापडला. पाटील यांच्यावर जानेवारीत शस्त्रक्रिया झाली होती. संपूर्ण आयुष्य निरोगी जगल्यानंतर वयाच्या ६४ व्या वर्षी कर्करोग झाल्यामुळे त्या मानसिक तणावात होत्या. अनेक वेळा त्यांनी आजारपणाबाबत कुटुंबीयांकडे खंतही व्यक्त केली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश मुगुटराव यांनी दिली.

Scroll to Top