कराची –
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान व त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांचे नाव पाक सरकारने ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकले आहे. त्यामुळे आता या दोघांना देशाबाहेर जाता येणार नाही. या दोघांसह आणखी ६०० जणांची नावे ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्यात आली आहेत. इम्रान पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्षही आहेत. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर गुरुवारी म्हणाले की, ‘लष्करी तळांवर हल्ला करणाऱ्यांना आम्ही विसरणार नाही.’
इम्रान यांना ९ मे रोजी अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर देशात प्रचंड हिंसाचार झाला. यात ८ जणांचा बळी गेला. इम्रान यांच्या समर्थकांनी लष्कराच्या तळांवर हल्ले केले. जिना हाऊसही जाळले. इम्रान यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यासह तब्बल १४० गुन्हे दाखल करण्यात आले. लष्कर इम्रान यांना ९ मे च्या हिंसाचाराचा सूत्रधार मानत आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात सबळ पुरावे गोळा केले जात आहेत. त्यामुळेच इम्रान व त्यांच्या पत्नी बुशरा यांच्यासह एकूण ६०० जणांची नावे नो-फ्लाय लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
९ मे च्या हिंसाचारानंतर लष्कर व पाक सरकारने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यानंतर इम्रान यांच्या बहुतांश निकटवर्तीयांनी त्यांना व त्यांच्या पक्षाला सोडले आहे. एकूण १६ बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. यात शिरीन मजारी, आमिर मेहमूद कियानी, मलिक अमीन अस्लम, मेहमूद मौलवी, आफताब सिद्दीकी, फयाज-उल-हसन चौहान, फवाद चौधरी व आमिर मीर यांचा समावेश आहे. काही जण तुरुंगात आहेत, तर काही परदेशात पळून गेले आहेत.