इम्रान खान यांच्या घरी पोलिसांची कारवाई

लाहोर- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तोशाखाना प्रकरणातील अडचणी अधिकच वाढल्या आहेत. तोशाखाना प्रकरणी इम्रान खान यांना आज इस्लामाबाद कोर्टात हजर होण्यास सांगण्यात आले होते. एकीकडे इम्रान खान इस्लामाबाद कोर्टाकडे रवाना झाले तर दुसरीकडे त्यांच्या लाहोर येथील घरी पाकिस्तान पोलीस पोहोचले. पंजाब पोलिसांनी इम्रान खान यांच्या घराच्या गेटवर बुलडोझर चालवत कारवाई केली. यावेळी पोलीस आणि इम्रान खान समर्थकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी २० कार्यकर्त्यांना अटक केली. तसेच कार्यकर्त्यांविरोधात पोलिसी बळाचाही वापर केला. इम्रान खान यांच्या लाहोर येथील घराजवळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, इम्रान खान यांनी इस्लामाबादच्या वाटेवर असतानाच एक व्हिडिओ शेअर केला. इस्लामाबादला मी पोहोचताच मला अटक करण्यात येईल, असे इम्रान खान यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. दरम्यान, तोषखाना प्रकरणाच्या सुनावणीसाठी लाहोरहून इस्लामाबादला जात असताना इम्रान यांच्या ताफ्यातील एका कारचा अपघात झाला. यात तीन जण जखमी झाले.

Scroll to Top