इस्टर्न फ्री-वे पश्चिमेला जोडणाऱ्या उन्नत मार्गाच्या भूपरीक्षणाला सुरुवात

मुंबई – मुंबई महानगरपालिकेने ईस्टर्न फ्री-वे उन्नत मार्ग पेडर रोडशी जोडणाऱ्या नव्या उन्नत मार्गाच्या भूपरीक्षणाची सुरुवात केली आहे. ५.६ किलोमीटर लांबीचा हा उन्नत मार्ग ऑरेंज गेट ते ग्रँट रोड असा असणार आहे. यामुळे दक्षिण मुंबईपासून इस्टर्न फ्री-वेपर्यंत केवळ सहा मिनिटांत पोहोचता येणार आहे.पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या इस्टर्न फ्री-वेवरून दक्षिण मुंबईत जाण्यासाठी सध्या पी. डिमेलो मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र या ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे या प्रवासाला ३० ते ४० मिनिटांचा वेळ लागतो. तो कमी करण्यासाठी नवा उन्नत मार्ग तयार करण्यात येणार असून तो ऑरेंज गेटपासून सुरु होऊन जे राठोड मार्ग आणि जेजे फ्लायओव्हरवरून जाणार आहे. याची दुसरी बाजू ग्रँट रोड, नाना चौक, नेपियन सी रोड, पेडर रोडला जोडली जाणार आहे. या मार्गासाठी १,३३० कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्याचे कंत्राट जे कुमार या कंपनीला देण्यात आले आहे. हा प्रकल्प येत्या साडेतीन वर्षांत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.