ई-रिक्षा,पेव्हर ब्लॉक रस्त्यासाठी
माथेरानकर एकजुटीने लढणार

माथेरान – महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या माथेरानमधील पर्यावरणपूरक ई-रिक्षा आणि क्ले पेव्हर ब्लॉक रस्त्यासाठी कायदेशीर लढाई लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय सर्व स्तरातील माथेरानकरांनी माथेरान पर्यावरण संवेदनशील नागरिक मंच यांनी आयोजित केलेल्या बैठकीत घेतला.यावेळी माथेरानमधील बहुसंख्य नागरिक यांचा सहभाग असलेल्या या प्रश्‍नांवर सर्वोच्य न्यायालयात जावून लढाई लढली पाहिजे आणि जिंकावी लागेल,असे आवाहन माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी केले.
पर्यावरण पूरक ई-रिक्षचा पायलट प्रकल्प संपला आहे. मात्र त्यामुळे बंद झालेली ई-रिक्षा सुरू करण्यात यावी आणि पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांच्या कामाला स्थगिती देण्याचा सर्वोच्य न्यायालयाने निर्णय घेतला आहे. त्याविरूध्द माथेरान पर्यावरण संवेदनशील नागरिक मंच यांच्याकडून नागरिकांची सभा येथील कम्युनिटी सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. राजकीय पक्ष,जेष्ठ नागरिक,हॉटेल व्यवसायिक, दिव्यांग यांची ही बैठक होती. माथेरान पर्यावरण संवेनशील मंचचे सुनील शिंदे, प्रदीप घावरे, शकील पटेल, राजेश चौधरी आदींनी ही बैठक घेण्यासाठी पुढाकार घेतला होता. दरम्यान, घोडेवाल्यांना पूर्वीपासूनच माथेरानमध्ये कोणत्याही प्रकारचे वाहन नको, इथे विकास होऊ नये असे वाटत आहे. माथेरानमध्ये ८५ टक्के रस्त्यांची कामे झाली असताना आताच क्ले पेव्हर ब्लॉकला विरोध का केला जातोय असा सवालही या बैठकीत अनेकांनी उपस्थित केला.

Scroll to Top