प्योंगयांग : उत्तर कोरियाने देशातील नागरिकांसाठी नवा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार देशातील मुले हॉलिवूड चित्रपट किंवा टीव्ही कार्यक्रम पाहताना आढळल्यास त्यांच्या पालकांना ५ वर्ष तुरुंगात टाकले जाईल. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचा हा आदेश केवळ हॉलिवूडसाठीच नाही तर दक्षिण कोरियाच्या चित्रपटांसाठीही जारी करण्यात आला.
प्योंगयांगमधील बैठकीदरम्यान नवीन कायद्याची घोषणा करताना, पालकांनी आपली मुले वेळोवेळी काय पाहत आहेत याची काळजी घ्यावी, असे म्हटले. जर पालकांनी मुलांचे घरी चांगले संगोपन केले नाही तर ते भांडवलशाहीचे गुणगान करत मोठे होतील आणि समाजविरोधी बनतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. या आदेशाद्वारे केवळ चित्रपटप्रेमींनाच लक्ष्य केले जात नाही, तर ज्यांना गाणे, नृत्य आणि बोलणे आवडते अशा लोकांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. जर कोणी दक्षिण कोरियाप्रमाणे परफॉर्म करताना आढळला तर त्याला आणि त्याच्या पालकांनाही ६ महिन्यांची शिक्षा होईल. जे पालक आपल्या मुलांना हॉलीवूडचे ब्लॉकबस्टर चित्रपट पाहू देतात त्यांना तुरुंगात टाकले जाईल, असे आदेशात म्हटले आहे.